
>>संजय मोने
‘साहेब’ आमच्यापेक्षा वयाने लहान असूनही व्यावसायिक रंगभूमीवर आम्हाला सीनियर. आम्ही सगळे जेव्हा एखादं नाटक प्रेक्षक म्हणून बघायला जायचो, तेव्हा तो प्रत्यक्ष रंगमंचावर अभिनेता म्हणून प्रख्यात होता. बाळसेदार तब्येत आणि खणखणीत आवाज, शिवाय वर अत्युत्कृष्ट वाणी हे त्याचं बलस्थान. त्याला ‘साहेब’ म्हणायला सुरुवात केली ती विजय केंकरे याने. तो साहेब म्हणजे आमचा अतुल परचुरे.
अतुल परचुरे याला ‘साहेब’ असे आम्ही संबोधतो. तोही सवयीने ते स्वीकारायला लागला. त्यालाही बरीच वर्षे लोटली. ज्याला आम्ही ‘साहेब’ म्हणतो, तो अतुल आमच्यापेक्षा तब्बल पाच–दहा वर्षांनी लहान आहे. आमचा एक संच किंवा समूह आहे. सध्याच्या बोली मराठीत ज्याला ग्रुप म्हटला जातो असा. सगळे आम्ही 1956 ते 1967 सालातले. बहुतेक सगळे डी. जी. रुपारेल माटुंगा महाविद्यालयातले चार–पाच वर्षे पुढेमागे, पण त्याला ‘साहेब’ म्हणायला सुरुवात केली ती विजय केंकरे याने. तो पोद्दार महाविद्यालयातला, पण पुढे न्यू लॉ महाविद्यालयात शिकायला आला होता. त्याचं ते शिक्षण जरा गुलदस्त्यातला विषय आहे. सध्याच त्याने आपल्या दिग्दर्शीय कारकीर्दीत शंभर नाटकांचा टप्पा गाठला. त्याचा एक सोहळासुद्धा दिमाखात साजरा केला गेला. त्याला सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरेंपासून सगळे मान्यवर उपस्थित होते. तसं बघायला गेलं तर ‘साहेब’ आमच्यापेक्षा वयाने लहान असूनही व्यावसायिक रंगभूमीवर आम्हाला सीनियर (वरिष्ठ म्हणायचं होतं, पण ‘सीनियर’ हा शब्द पटकन आठवला). आम्ही सगळे जेव्हा एखादं नाटक प्रेक्षक म्हणून बघायला जायचो, तेव्हा तो प्रत्यक्ष रंगमंचावर अभिनेता म्हणून प्रख्यात होता (‘सेलिब्रिटी’ या शब्दाचा सैल आणि गैरवापर व्हायच्या आधी ‘प्रख्यात’ हाच शब्द प्रचलित होता. ‘सेलिब्रिटी’ या शब्दाचा अर्थ, थोडक्यात सांगायचं तर तुम्ही अभिनेता किंवा अभिनेत्री असल्याचा संशय व्यक्त केला जातो, तेव्हा हा शब्द वापरात आणायला बरा पडतो). बालरंगभूमीवर त्याचे एक नाटय़ गाजत होते. शिवाय, त्याच्या अभिनयाचा बोलबालाही झाला होता. याशिवाय त्याने एखाद–दोन चित्रपटही केले होते. बालकलाकार म्हणून फुकट जाण्याच्या कालखंडातही तो कधी वाया गेला नाही. त्याचे पणजोबा म्हणजे गणपतराव बोडस. विजय केंकरेचे वडील म्हणजे आमच्या सगळय़ांचे मित्र. त्यांचं वय कधीच आमच्या काय किंवा कुणाच्याच मैत्रीआड आलं नाही. दामू केंकरे (त्यांना कधी कुणी त्यांच्या ‘दामोदर’ या नावाने हाक मारल्याची इतिहासात नोंद नाही). अतुलला कायम त्याच्या थंड, अनुनासिक स्वरात ‘गणपतराव’ अशी हाक मारायचे (त्यांचं ते संबोधन आणि तो स्वर लेखनात उतरवून काढणे अशक्य आहे). तसा अतुल आमच्या रुपारेलला आला तेव्हा आम्ही सगळे बाहेर पडलो होतो, पण ते आवार इतकं मोहमय होतं की, अनेक विद्यार्थी नंतर पाच–सात वर्षे तिथे येत असत. बाळसेदार तब्येत आणि खणखणीत आवाज, शिवाय वर अत्युत्कृष्ट वाणी हे त्याचं बलस्थान. ते तर कलाकाराला आवश्यक असतंच (हल्ली जरा व्यायामपटूही कलाकार म्हणून गणले जातात तो भाग वेगळा).
“मी तीन तास व्यायाम करतो, अभिनेता होण्यासाठी’’ असं सांगणाऱया मुलाला.
“छान! पण जरा काही वेळ जिभेचा किंवा बुद्धीचा व्यायाम फार नाही, पण अर्धा तास केलास तर जास्त काळ टिकून राहशील’’ असं सांगायला तो कधीच कचरत नाही.
मी त्याला ओळखायला लागलो त्यालाही आता पस्तीस वर्षे होऊन गेली, पण कायम त्याची तीक्ष्ण विनोदबुद्धी माझ्या लक्षात आहे. कधी ती गुदगुल्या करते तर कधी फटकावून काढते.
आयुष्यात पहिल्यांदा साहित्य संघात, गिरगावात मी त्याचं नाटक पाहिलं, ‘टिळक आणि आगरकर’. त्यात प्रमोद पवार आणि श्याम पोंक्षे लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या भूमिका करत. शिवाय, भक्ती बर्वे त्यात होत्या. मी त्यांना बघायला गेलो होतो, पण लक्षात राहिला तो आगरकरांच्या पुतण्याची भूमिका करणारा अतुल परचुरे. तेव्हा त्याआधी त्याची माझी ओळख नव्हती. एक लहान मुलगा विश्राम बेडेकरांची भाषा अत्यंत सहजपणे बोलत होता. शिवाय, अभिनयाचा प्रश्न तेव्हाही नव्हता, आजही नाही. कमाल भूमिका केली होती त्याने! महाविद्यालयात आल्यानंतर त्याने एकांकिका वगैरे फार केल्या नाहीत. कारण त्याच्याकडे बाहेर कामंही होती. आज आठवून बघितलं तर त्याची आणि माझी, धनंजय गोरे, अजित भुरे, प्रदीप कारुळकर, सतीश जोशी, ललित जाधव यांच्याशी कधी आणि कशी ओळख झाली ते आठवत नाही (अतुल वगळता आम्ही सहा जण स्वतःला ‘प्रभात फिल्म्स अधिक एक’ असं म्हणायचो) आणि त्याची आता गरजही नाही. मग विजय केंकरे आला आणि आम्ही जवळ जवळ रोज एकमेकांना भेटतो. म्हणजे आमच्यातला कोणीच कोणाला भेटलं नाही, असा गेल्या चाळीस वर्षांत एकही दिवस नाही. बरेचदा अतुल आणि विजय केंकरे आमच्यात नसतात. कारण अतुलकडे सातत्याने काम असतं आणि विजय केंकरे हा तिन्ही लोकी संचारत असतो. कारण पूर्वी एका नाटकात तो नारदाची भूमिका करत असे (त्याचा नारद हा न गाणारा एकमेव नारद. मात्र नारळासारख्या दिसणारा डोक्यावरच्या विचित्र केसांपासून त्याची सुटका झाली नव्हती). ती भूमिका तो आजही निभावतो आहे.
अतुलचा अभिनय हा अभिनय नसतोच, ते असतं रंगमंचावर सहजपणे वावरणं. कुठलीही मुलाखत (मला जाणवलेली किंवा भावलेली व्यक्तिरेखा या छापाची) त्याबद्दल तो देत नाही आणि तरीही त्याला ते जमून जातं. मग तो ‘नातीगोती’मधला बच्चू असो किंवा ‘तरुण तुर्क’मधला मुकुंदा ऊर्फ कुंदा असो. या दोन टोकाच्या भूमिका असलेले प्रयोग तो एकापाठोपाठ करत असे. लीलया ‘बे दुणे पाच’ नाटकातला वकील त्याने सादर केला होता. एकही पदरचं वाक्य न बोलताही विनोदी भूमिका कशी करावी याचा तो वस्तुपाठ होता (अन्यथा लेखकाची अल्पमती किंवा बुद्धीहीन मानवात गणना करून बरेचदा विनोदवीर भूमिका करतात). ‘बिल्लू बार्बर’मधल्या वाटय़ाला आलेल्या एकमेव दृश्यात त्याने संपूर्ण चित्रपटातला सगळय़ात हास्यास्पद प्रसंग अप्रतिम वठवला होता, परंतु ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकात त्याने पु.ल. देशपांडे यांची सादर केलेली भूमिका हा त्याच्या कारकीर्दीतला एका मैलाचा टप्पा आहे. ते पात्र इतक्या अप्रतिमपणे उभं केलं होतं की, वाटत होतं स्वतः पु.ल. देशपांडेच अभिनय करत आहेत. सुंदर अभिनयाचा तो एक विलक्षण आविष्कार होता. बरेचदा आपण सहजपणे केलेल्या गोष्टीला डाव्या हाताने केली असं म्हणतो (राजकीय नेत्यांना बरेचदा असे उजवे हात असतात). अतुलला बहुदा असे दोन–तीन डावे हात असावेत आणि त्यातल्या एका कुठल्या तरी हाताने तो या भूमिका सादर करतो. अजूनही त्याला अभिनय करायला उजवा हात वापरावा लागला नाहीये. विलक्षण बुद्धिमान असल्याने उगाच निरीक्षण करून भूमिका कशी केली याचं कुठल्याही पद्धतीनं तो विवेचन करत नाही. आपण वावरत असलेल्या जगातल्या जवळ जवळ सगळय़ा व्यक्तिरेखा किंवा माणसं पु.ल. देशपांडे यांनी आपल्या लेखनातून आपल्यासाठी आणून ठेवलेल्या आहेत. त्यांनी लिहिलेलं आपण फक्त वाचलं की, सगळं आपल्याला जमून जातं यावर त्याचा ठाम विश्वास आहे. कारण त्याने त्यांचे संपूर्ण साहित्य पारायणे करावीत तसे वाचून काढले आहे. सती जाणाऱया बाईची भूमिका करायला लागली तर कसं निरीक्षण करणार हा त्याचा प्रश्न बिनतोड आहे. एवंगुण वैशिष्टय़ांमुळे अतुल परचुरे ‘साहेब’ या बिरुदाला एकदम योग्य आहे.
(लेखक ज्येष्ठ अभिनेता आहेत.)





























































