
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांच्या मागे ईडी व सीबीआय चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे. अशातच भाजप आमदार राहुल कुल अध्यक्ष असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्यात 500 कोटींचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. हे सर्व प्रकरण ‘ईडी’ व ‘सीबीआय’च्या ताब्यात देऊन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत उपमुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, आपल्या नेतृत्वाखालील सरकारने सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचार खणून काढण्याचे ठरवले आहे, त्याबद्दल आपले अभिनंदन. भारतीय जनता पक्षाचे काही नेते आपल्या अंतस्थ गोटात वावरत असतात, ते सातत्याने प्रमुख विरोधी पक्षांचे व्यवहार, त्यांच्या साखर कारखान्याच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आणत आहेत. या नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिराही लावला जातो. भ्रष्टाचाराचा धर्म व राजकीय पक्ष नसतो. त्यामुळे भ्रष्टाचाराची वाळवी नष्ट होणे गरजेचे आहे, या मताचा मी आहे.
पुणे जिह्यातील दौड तालुक्यातील ‘भीमा सहकारी साखर कारखान्याने गेल्या काही वर्षांत केलेल्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे प्रकरण म्हणजे सरळ सरळ अंदाजे 500 कोटी रापयांचे ‘मनी लॉडरिंगचे आहे. कोल्हापूरचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे व तपास यंत्रणांच्या धाडी त्यासंदर्भात पडत आहेत. पण दौंडच्या भीमा सहकारी साखर कारखान्यातील शेकडो कोटीच गैरव्यवहार यापेक्षा भयंकर आहे व या भ्रष्टाचारास राजकीय संरक्षण मिळत असेल तर ते गंभीर आहे, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
सोमय्या या प्रकरणावर मूग गिळून गप्प
भाजपाच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचे मुख्य सुत्रधार किरीट सोमय्या यांच्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत आपण भीमा सरकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची माहिती घेऊ शकता. त्यांच्या कार्यालयात हे प्रकरण संबंधित तक्रारदार घेऊन गेले आहेत. पण किरीट सोमय्या त्या भ्रष्टाचारावर मूग गिळून बसलेत. जनतेच्या पैशांची प्रचंड लुटमार या कारखान्यात झाली आहे. हे सर्व प्रकरण तत्काळ ईडी व सीबीआयच्या ताब्यात देऊन भीमा सहकारी साखर कारखान्यात घोटाळा करणाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी राऊत यांनी केली.
प्रकरण काय…
भीमा सहकारी साखर कारखान्याने ऊस तोडणी वाहतुकीच्या कारणासाठी एकाच वेळी एकाच कारणासाठी एकापेक्षा अधिक बँकांचे कर्ज काढून 210 कोटी 25 लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला.
अध्यक्ष राहुल कुल, सभासद मंडळ व लेखापरिक्षक यांनी 2016-17, 2019-20, 2020-21, 2021-22 या वर्षांत गळीत हंगाम बंद असताना अनामत येणे रक्कमेच्या माध्यमातून 128 कोटी 14 लाख आणि खुल्या साखर साठय़ाची विक्री करून 32 कोटी 11 लाख असा 160 कोटी 25 लाखांचा गैरव्यवहार केला.

































































