शोध सत्याचा -सांगे वडिलांची कीर्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> चंद्रसेन टिळेकर

हजारो वर्षे या देशाला अध्यात्माचे वेड लागले आहे, ते झिडकारून त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या दैववादाला गाडून विज्ञानाची कास धरली पाहिजे. त्याशिवाय या देशावर विकासाची पहाट उगवणार नाही

मुंबई उपनगरात ‘फुले, सावरकर आणि पु. ल., आम्ही तुमचा पराभव केला आहे’ या विषयावर माझे व्याख्यान होते. त्यात मी या तिघा दिग्गजांनी हिंदू समाजातील दुष्ट रूढींवर कसे आघात केले आहेत हे विस्ताराने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. या व्याख्यानाचे सार असे होते की, महात्मा फुल्यांचा पराभव बहुजन समाजाने, सावरकरांचा हिंदुत्ववाद्यांनी, तर पुलंचा पराभव त्यांना दैवत मानून डोक्यावर घेणाऱया पांढरपेशा समाजाने केला. प्रश्नोत्तरे संपल्यावर स्टेजच्या खाली उतरलो, तर साधारणतः ऐंशीतील एक ज्येष्ठ व्यक्ती समोर आली आणि म्हणाली, ‘‘या तिघांनी हिंदू समाजाच्या दुष्ट चालीरीतींवर कोरडे ओढले. ते ऐकून एखाद्याला वाटेल या धर्मात काहीच चांगले नसावे, पण हे तुम्हालाही कबूल करावे लागेल की, जगात ज्या प्राचीन संस्कृती आहेत. त्यामध्ये हिंदू संस्कृती आहे आणि ती सर्वश्रेष्ठही आहे’’

मी थोडेसे आढेवेढे घेत म्हणालो, ‘‘एकेकाळी ती तशी असेलही, पण आधुनिक काळात प्रगत पाश्चात्य राष्ट्रांनी जी भरारी मारली आहे, तिच्या तुलनेत आपली संस्कृती मागेच पडली आहे’’

‘‘अजिबात नाही. आज ते तुम्हाला प्रगत दिसतंय. कारण त्यांनी असंख्य शोध लावले. ऐहिक जीवन सुखी केले म्हणून. पण या साऱया शोधांच्या संकल्पना मूळच्या कोणाच्या?’’
‘‘कोणाच्या?’’

‘‘आम्हा हिंदुस्थानींच्या! आजचे सारे शोध आणि त्यामागचे आधुनिक विज्ञान आमच्या धर्मग्रंथात आमच्या ऋषीमुनींनी तब्बल पाच हजार वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले आहे. हे आमचे ग्रंथ आमच्यावर राज्य करणाऱया ब्रिटिशांनी पळवले आणि त्यातल्या ज्ञानाचा-विज्ञानाचा उपयोग करून आजचे नाना तऱहेचे शोध लावले. मला सांगा, गुरुत्वाकर्षणाचा शोध कुणी लावला?’’
‘‘अर्थातच न्यूटनने’’

‘‘साफ चूक. तो शोध लावला आमच्या भारद्वाज ऋषींनी. त्यांनी दोन हजार वर्षांपूर्वीच एका ग्रंथात ते ग्रंथित करून ठेवलंय. ते जाऊ द्या, मला सांगा अणूचा शोध कोणी लावला?’’
‘‘मला कल्पना आहे की, तुम्ही कणाद ऋषींचे नाव माझ्याकडून अपेक्षित करत असाल, पण त्याच कालावधीत तो शोध ग्रीक तत्त्ववेत्ता डेमोव्रॅटिस याने लावला असे पाश्चात्य जग मानते, परंतु आपण ते श्रेय आपल्या कणाद ऋषींना देऊ या’’

‘‘आता कसे बोललात!’’ ते खूश होऊन म्हणाले.

‘‘पण त्यांची अणूची कल्पना फारच ढोबळ स्वरूपाची होती. याबाबतीत खरे मानकरी आहेत ते ब्रिटिश संशोधक जॉन डाल्टन!’’

पण यानंतर मी फारसा वाद न घालता स्वतःची सुटका करून घेतली. कारण आम्हा हिंदुस्थानींमध्ये एक मोठे वैशिष्टय़ आहे, ते म्हणजे सतत वडिलांची कीर्ती सांगायची. या वृत्तीलाच रामदास म्हणतात, ‘‘वडिलांची कीर्ती सांगे तो एक मूर्ख.’’

दुसरे महत्त्वाचे म्हणजे, त्या काळच्या ज्या काही कल्पना ऋषीमुनींनी केल्या, त्या निश्चितच कविकल्पना होत्या. त्या कितपत खऱया आहेत याचा पडताळा घेण्यासाठी त्यांनी कोणतीही साधने निर्माण केली नाहीत, जशी आधुनिक युगातील शास्त्र्ाज्ञांनी केली. तेव्हा ऋषीमुनींच्या लिखाणाला विज्ञानाचा दर्जा देणे नक्कीच भोळसटपणाचे ठरेल.

आमच्याकडे जगातले सगळे आधुनिक ज्ञान होते. विमाने, जहाजे होती हे सांगताना सनातनी व्यक्तीचा ऊर भरून येतो, पण एवढी जर प्रवासाची साधने उपलब्ध होती, तर एकजात आमचे सारे देव आणि देवता वाहन म्हणून उंदीर, बैल, रेडा, गरुड असले प्राणी का वापरत होते, या प्रश्नाला मात्र त्यांच्याकडे उत्तर नसते किंवा जहाजे आणि विमाने कोणते इंधन वापरीत ते मात्र त्यांना सांगता येत नाही.

बरं, ही शेखी केवळ सामान्य सुशिक्षित अडाणी व्यक्तीपुरती मर्यादित नाही. एकवेळ आपण हसून त्यांच्याकडे दुर्लक्ष करू, पण जेव्हा समाजातली नामवंत मंडळी सवंग लोकप्रियतेच्या आहारी जाऊन दिशाभूल करणारी वक्तव्ये करतात, तेव्हा मात्र मौन बाळगणे धोक्याचे ठरते. काही वर्षांपूर्वी दिल्लीला इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. त्यामध्ये देशोदेशीचे शास्त्र्ाज्ञ हजर होते. त्या परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी काय वक्तव्य करावे, तर म्हणे आमच्या देशाला प्लॅस्टिक सर्जरीचे ज्ञान अवगत होते. त्या जोरावरच आम्ही हत्तीचे मुंडके गणेशाला लावले होते. विश्वास बसणार नाही, पण देशोदेशीचे शास्त्र्ाज्ञ गालातल्या गालात हसत होते. आमच्या देशातील अनेक शास्त्र्ाज्ञही काही वेळा अशास्त्र्ााrय वक्तव्य करताना दिसतात. याचे कारणही सवंग लोकप्रियतेचा मोह हेच आहे. म्हणूनच प्रख्यात संगणक तंत्रज्ञ डॉ. विजय भटकर ज्योतिषशास्त्र्ााची तळी उचलतात आणि प्लॅंचेट केल्यावर आत्मा येतो असे म्हणतात. इस्रोसारख्या जगप्रसिद्ध संस्थेत काम करणारे नामवंत शास्त्र्ाज्ञ स्पुटनिक सोडण्यापूर्वी जवळच्या मंदिरात आशीर्वादासाठी धाव घेतात. अर्थात या ठिकाणी सवंग लोकप्रियता ही बाब नसते, तर पिढय़ान्पिढय़ा आपल्या देशातल्या कुटुंब पद्धतीमध्ये लहानपणी जे भाविक, काहीसे दैववादी संस्कार आपल्यावर असल्याचे यामागचे खरे कारण आहे.

इतर देशांच्या तुलनेत आधुनिक ज्ञान-विज्ञानाच्या संकल्पना आपल्या प्राचीन हिंदुस्थानींच्या धर्मग्रंथात नमूद केलेल्या असल्याची शक्यता कुणीच नाकारीत नाही. यात काही गौरवाची बाब नाही याचे कारण हेच आहे की, या जगात ज्या चार-पाच प्राचीन संस्कृती उदयाला आल्या (उदा. चीन, इजिप्त, ग्रीक इ.) त्यामध्ये हिंदुस्थानी संस्कृती ही एक आहे. तेव्हा नातवाच्या आधी आजोबाला एखाद्या गोष्टीचे ज्ञान झाले तर त्यात काwतुक ते कसले?

अगदी परखड शब्दांत सांगायचे तर आमचा समाज जेवढा देव-धर्म अन् अध्यात्मात रंगला, तेवढा तो आधुनिक विचारात रमला नाही. भक्तिमार्ग तुम्हाला चिकित्सेला, विवेकी विचाराला पारखा करतो. मग समाजाचा विकास व्हावा कसा? कारण आदिमानवापासून ते आधुनिक मानवापर्यंत जी माणसाची प्रगती झाली तीच मुळी विचार करण्यातून, प्रश्न विचारण्यातून, चिकित्सेच्या ध्यासातून झाली. आम्ही हे अपवादानेच केले. आम्ही एवढेच केले की, पूर्वजांच्या असलेल्या-नसलेल्या कीर्तीचे सतत ढोल वाजवत राहिलो.

हे चित्र बदलायचे असेल तर प्रथम आपण आमच्या पूर्वजांनी विविध क्षेत्रांत काय पराक्रम केले, त्याची शेखी जी उठता बसता आपण मिरवत असतो ते बंद केले पाहिजे. पुनरुज्जीवनाची लाट आपल्या देशात काही कथित धर्मप्रेमी आणू पाहताहेत, ती प्राणपणाने थांबवली पाहिजे. हजारो वर्षे या देशाला अध्यात्माचे वेड लागले आहे, ते झिडकारून त्याच्या अनुषंगाने येणाऱया दैववादाला गाडून विज्ञानाची कास धरली पाहिजे. त्याशिवाय या देशावर विकासाची पहाट उगवणार नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.

n [email protected]

(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडीत आहेत)