
श्री विठ्ठलाच्या परिवार देवतांपैकी अंबाबाई मातेच्या मंदिरातील पितळी पादुका पळविणाऱ्याला मंदिर समितीच्या कर्मचाऱ्याने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली आहे. बाळू मच्छिंद्र खाडे (वय 35, रा. खाडे वस्ती, आढीव, ता. पंढरपूर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या अधिपत्याखाली 28 परिवार देवतांची मंदिरे आहेत. ही मंदिरे सकाळी 6 ते रात्री 10 या कालावधीमध्ये भाविकांना दर्शनासाठी खुली असतात. पंढरपूर-सोलापूर रोडवरील चंद्रभागा नदीच्या पश्चिमेला श्री अंबाबाई मंदिर आहे. या मंदिरामध्ये पूजा व अर्चा करणे, स्वच्छता ठेवणे, इत्यादी कामे करण्यासाठी पुजारी व सेवकांची पूर्णवेळ नियुक्ती केलेली आहे.
रविवारी सकाळी सहा वाजता श्री अंबाबाई मंदिर उघडण्यात आले. सकाळी पूजा झाल्यानंतर तेथील पुजारी महेश दिलीप मंजरतकर हे सकाळी साडेआठच्या दरम्यान श्री अंबाबाई मंदिराच्या परिसरातील स्वच्छतेचे काम करीत होते. स्वच्छतेचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर मंजरतकर हे श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जात असताना त्यांना श्री अंबाबाई मातेच्या पितळी पादुका जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पादुकांची ताबडतोब शोधाशोध सुरू केली. त्यावेळी एक व्यक्ती मंदिराच्या बाहेरील बाजूस धावत जात असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे मंजरतकर यांनी त्याचा पाठलाग करून त्या महाद्वार येथे पकडले. त्याचे नाव बाळू खाडे आहे. खाडे याला पोलिसांच्या ताब्यात देऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























































