
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे घनिष्ठ संबंध आहेत. अदानींच्या शेल (बोगस) कंपन्यांमध्ये 20 हजार कोटींची गुंतवणूक कोणी केली? हे पैसे कोणाचे आहेत? हा पैसा कोठून आला? अशी प्रश्नांची सरबत्ती करीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार हल्लाबोल केला. आपले पितळ उघडे पडेल याची भीती पंतप्रधान मोदींना आणि भाजपला वाटते. त्यामुळेच माझी खासदारकी रद्द केली. मात्र, आयुष्यभरासाठी खासदारकी रद्द केली किंवा धमक्या दिल्या तरी मी घाबरणार नाही, माफी मागणार नाही, गुडघे टेकणार नाही. मी प्रश्न विचारणारच, असा निर्धारही राहुल गांधींनी व्यक्त केला.
खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. संसदेत विचारलेले प्रश्न, मोदी-अदानी यांचे संबंध आणि लोकसभा सचिवालयाकडून झालेली अपात्रतेची कारवाई या सगळय़ाचे बिंदू जोडून राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी आणि भाजपवर हल्ला चढविला. आपल्याविरुद्ध कसे षडयंत्र रचले जात आहे. मोदी सरकार आणि भाजपकडून अदानी प्रकरण या मूळ मुद्दय़ावरून दुसरीकडे लक्ष कसे वळविण्याचा प्रयत्न होतो आहे, हे राहुल गांधी यांनी सांगितले.
क्यू हवा निकल गई क्या?
यावेळी एका पत्रकाराने तीनवेळा ओबीसीची माफी मागण्यासंदर्भात आणि भाजपच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारला. त्यावर राहुल गांधी म्हणाले, ‘तुम्ही तीनवेळा एकच प्रश्न विचारला. प्रश्न विचारायचा असेल तर किमान फिरवून विचारा. भाजपसाठी काम करता का? करायचे असेल तर छातीवर भाजपचा लोगो लावून फिरा. त्यानंतर मी तुमच्या प्रश्नांना उत्तर देईन. तुम्ही पत्रकार असल्याचा दिखावा करू नका.’ यावेळी शांत झालेल्या पत्रकाराला ‘क्यू हवा निकल गई क्या?’ असा टोलाही राहुल गांधींनी लगावला.
विरोधी पक्षांचे आभार; सर्व एकत्र काम करतील
माझ्या भूमिकेला विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला. त्याबद्दल सर्वांचे आभार. पुढील काळात विरोधक एकत्र काम करतील, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. मोदी सरकार ‘पॅनिक मोड’वर गेले हे सत्य आहे. खासदारकी रद्द करून मोदी सरकारने विरोधी पक्षांच्या हातात सर्वात मोठे हत्यार दिले आहे. कारण पंतप्रधान मोदी हे भ्रष्ट व्यक्तीला (अदानी) का वाचवत आहेत? हा प्रश्न जनता विचारत आहे.
राहुल गांधी काय म्हणाले?
– अदानी प्रकरणावर मी संसदेत पहिल्यांदा प्रश्न विचारला तेव्हापासून हा सगळा प्रकार सुरू झाला. अदानी आणि पंतप्रधान मोदींचे काय संबंध आहेत? मोदी हे अदानींना का वाचवत आहेत? एवढाच माझा प्रश्न होता. अदानी आणि मोदींची दोस्ती कशी आहे? हा पह्टो मी दाखविल्यानंतर भाजप खासदारांनी गदारोळ घातला. मला बोलू दिले नाही. लोकसभेत केलेले भाषण पटलावरून काढून टाकण्यात आले.
अदानी प्रकरणावरून आपले पितळ उघडे पडेल म्हणून पंतप्रधान मोदी आणि भाजप घाबरले आहेत. त्यामुळेच माझी खासदारकी रद्द केली.
मोदी आणि अदानींचे संबंध मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासूनचे आहेत. त्यांची घट्ट मैत्री आहे.
अदानी यांनाच संरक्षण विभागातील तसेच देशभरातील कंत्राटे कशी काय मिळतात?
अदानींच्या शेल (बोगस) कंपन्यांमध्ये 20 हजार कोटी रुपये कोणी गुंतवले? हे पैसे कोणाचे आहेत? हा पैसा कोठून आला?
अदानींवर केलेले आरोप हे भाजपच्या लोकांना देशावरचे आरोप वाटतात. अदानी म्हणजे देश आहेत का?
सत्य बोलणे माझ्या रक्तात आहे आणि मी सत्य बोलतच राहणार. सत्याच्या मार्गाने चालत राहणे ही माझी तपस्या आहे.
देशातल्या लोकशाहीवर रोज आक्रमण होत आहे, मात्र लोकांनी शांत बसून सगळे सहन करावे, अशी सरकारची अपेक्षा आहे.
मी विदेशातून मदत मागितली, असे खोटे आरोप माझ्यावर करण्यात आले. मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री खोटं बोलत आहेत.
ओबीसींना पुढे करून भाजपकडून मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न
सर्व चोर मोदी आडनावाचे कसे असतात? असे विधान राहुल गांधींनी केले होते. ओबीसींचा अपमान केला, असा आरोप भाजप करत आहे. यावर राहुल गांधी म्हणाले, मी ‘भारत जोडो’ यात्रेवेळी सर्व समाजघटकांना सोबत घेऊन चाललो. सर्वच समाजाचे लोक सहभागी झाले होते. याकडे लक्ष वेधत राहुल गांधी म्हणाले, मुळात हा ओबीसींचा विषयच नाही. हा अदानी आणि मोदींच्या संबंधाचा विषय आहे. ओबीसींना पुढे करत भाजप मुख्य मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे.



























































