
अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे ग्रामदैवत परमेश्वर यात्रेत रथ ओढत असताना रथाचे दगडी चाक निसटून भाविकांच्या अंगावर पडल्याने दोन भाविकांचा मृत्यू झाला. सायंकाळी सातच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेनंतर यात्रेतील अन्य धार्मिक कार्यक्रम करण्यात आले आहेत.
गंगण्णा गिरमला नंदे आणि गंगाराम तिपण्णा मंजुळकर अशी मृत्यू झालेल्या भाविकांची नावे आहेत. या घटनेत अन्य काही भाविक जखमी झाले आहेत.
अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावात आज ग्रामदैवत परमेश्वर यात्रा होती. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविक या यात्रेत सहभागी होतात. या यात्रेत परंपरेनुसार परमेश्वर मंदिर ते बसवण्णा मंदिरापर्यंत रथयात्रा असते. दगडी चाके असलेला भव्य रथ भाविकांकडून ओढला जातो. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास भाविक बसवण्णा मंदिरापासून परमेश्वर मंदिराकडे रथ ओढत नेत असताना रथाचे 12 ते 15 फूट उंचीचे दगडी चाक निखळले आणि बाजूला रथ ओढणाऱया भाविकांच्या अंगावर पडले. यामुळे रथाचा डोलाराही कलला. यात दगडी चाक अंगावर पडून गंगण्णा गिरमला नंदे आणि गंगाराम तिपण्णा मंजुळकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.
या घटनेनंतर यात्रेत प्रचंड खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने धाव घेत भाविकांना रथयात्रेच्या मार्गावर बाजूला हटविले आणि गावात बंदोबस्त वाढविला. या घटनेत अन्य काही भाविक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर यात्रेतील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.



























































