धारावीत बापाने मुलाचा गळा दाबून ठार मारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धारावीत नात्याला काळिमा फासणारी घटना घडली. निर्दयी बापाने विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पोटच्या दोन वर्षांच्या मुलाची गळा दाबून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. शाहूनगर पोलिसांनी त्या खुनी बापाला भिवंडी येथे पकडले. रहमत अली शौकत अली अन्सारी (30) असे त्या आरोपीचे नाव आहे.

रेहमत हा त्याची पत्नी, दोन वर्षांचा मुलगा मोहमद असद, मोठा भाऊ व त्याच्या कुटुंबीयासोबत धारावीच्या जनता सोसायटीत राहत होता. रेहमतचे अन्य एका महिलेशी विवाहबाह्य संबंध होते. त्याला तिच्याशी लग्न करायचे होते, पण पत्नी व मुलगा त्याला अडसर ठरत होते. मंगळवारी रात्री तो असद आणि मोठय़ा भावाच्या दोन मुलांना चॉकलेट घेऊन देण्यासाठी घराबाहेर गेला. दुकानात त्याने तिघांना चॉकलेट घेऊन दिले व भावांच्या दोघा मुलांना घरी जाण्यास सांगितले. त्यानंतर रेहमत त्याचा मुलाला घेऊन तो काम करतो त्या कारखान्यात घेऊन गेला. तेथे त्याने मुलाचा गळा दाबून त्याची हत्या केली.

मग तो मृतदेह एका प्लॅस्टिकच्या गोणीत भरून केमकर चौकाजवळ असलेल्या खाडीत फेकून दिला. दरम्यान, बराच वेळ असद घरी न आल्याने सर्वांनी शोधाशोध सुरू केली. रेहमतनेदेखील मुलगा कुठे गेला, असे नाटक करत त्याला शोधण्यास सुरुवात केली. अखेर आज पहाटे चारच्या सुमारास परिसरातील नागरिकांना मुलाचा मृतदेह सापडला. रेहमतनेच हे कृत्य केले असावे असा संशय बळावल्याने नागरिकांनी त्यालाही पकडून आणले, मात्र त्यांच्या तावडीतून सटकून तो पळून गेला. हा प्रकार कळताच शाहूनगर पोलीस ठाण्याचे सपोनि आव्हाड आणि चव्हाण यांनी तांत्रिक बाबी व खबऱयांच्या मदतीने शोधाशोध सुरू केली. तेव्हा रेहमत भिवंडीत असल्याचे निष्पन्न झाले. तो यूपीला पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे कळताच पोलिसांनी भिवंडी गाठून त्याच्या मुसक्या आवळल्या.