
कुडाळ तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला आता सॅटेलाईट फोन यंत्रणा पुरविण्यात येणार आहे. पावसाळी आपत्तकालीन स्थितीत सर्व यंत्रणा कोलमडली तरी ही संपर्क यंत्रणा कार्यरत राहणार आहे. तसेच प्रत्येक गावामध्ये शासनाकडून आता ‘आपदा मित्र’ नियुक्त करण्यात येणार असून हे ‘आपदा मित्र’ प्रशिक्षित व आवश्यक त्या साहित्यासह गावाच्या स्तरावर कार्यरत असणार आहेत. आपत्तकालिन यंत्रणेच्या ताफ्यात या दोन नवीन महत्वाच्या घटकांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती कुडाळचे तहसिलदार अमोल पाठक यांनी तालुका आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या बुधवारी झालेल्या बैठकीत दिली. यावेळी पाठक यांनी प्रत्येक विभागाच्या अधिकार्यांना आपत्तकालिन स्थितीत सतर्क राहण्याच्या व पुर्व नियोजना संदर्भात विविध मार्गदर्शन सुचना केल्या.
कुडाळ तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षाची बैठक बुधवारी सायंकाळी कुडाळ तहसिलदार अमोल पाठक यांच्या दालनात संपन्न झाली. यावेळी तहसिलदार अमोल पाठक, पोलीस निरीक्षक शंकर चिंदरकर, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी करिश्मा नायर, ओरोस पोलिस स्टेशनचे अधिकारी देवरे, निवती पोलिस स्टेशनचे राणे, महामार्ग प्रशासनाचे मो. रा. साळुंखे यांसह विविध विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
तहसिलदार अमोल पाठक यांनी बोलताना सांगितले की, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा मुख्य लक्ष बांव, पावशी, चेंदवण, कवठी, बिबवणे या भागात राहणार आहे. सद्यस्थितीत महामार्ग चौपदरीकरणानंतर बिबवणे हा नविन स्पॉट तयार झाला आहे. याकडेही आता लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत आपत्तीग्रस्त गावामध्ये ज्या बोट कार्यरत होणार आहेत. त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच मुणीगी येथे गाळ साचल्याने दरवर्षी पुर येत आहे. हा आपत्तीकालीन स्थितीच्या अनुषंगाने हॉट स्पॉट बनला आहे. याठिकाणीही बोट देण्यासंदर्भात आपण प्रयत्न करणार आहोत. शासकीय कर्मचार्यांनी कार्यालयीन कामकाजाबरोबरच अशा आपत्तकालिन स्थितीत माणुसकीच्या भावनेने कार्यरत राहावे. या काळात इतर सर्व मोबाईलची संपर्क यंत्रणा बंद पडली तरी बिएसएनएलने आपली यंत्रणा सदैव चालु ठेवण्याच्या दृष्टिने प्रयत्न करावा.
महामार्ग प्रशासनाने महामार्गालगत पाण्याच्या प्रवाहाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी गाळ साचले आहेत ते पाण्याचे प्रवाह मोकळे करावेत. शिक्षण विभाग प्रशासनाने शाळांच्या वर्ग खोल्या निवारा केंद्रासाठी द्याव्यात अशा स्थितीत कोणत्याही पत्राची प्रतिक्षा न करता शाळांच्या वर्ग खोल्याच्या चाव्या संबंधित यंत्रणेकडे सुपूर्त कराव्यात. कुडाळ तालुक्यामध्ये हिर्लोक व कुंदे या दोनच ठिकाणी विज संबधी यंत्रणा कार्यरत आहे. त्यामुळे सर्वांनी दामिनी अॅपचा वापर करावा. या माध्यमातुन विजेबाबतची पुर्व कल्पना मिळण्यास सहाय्य होणार आहे. नगरपंचायत प्रशासनाने गटारांची साफसफाई वेळीच करावी अशा विविध सुचना तहसिलदार यांनी यावेळी केल्या. यावेळी सरंबळ येथे बिएसएनएलने आपले नेटवर्क सक्षम करावे अशी मागणी करण्यात आली. महामार्गावर पावशी व कुडाळ राज हॉटेल दरम्यान पाणी साचते याबाबत महामार्ग प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी तहसिलदार पाठक यांनी प्रत्येक विभागाच्या अधिकार्यांना आपत्तकालिन स्थितीत सतर्क राहण्याच्या व पुर्व नियोजना संदर्भात विविध मार्गदर्शन सुचना केल्या.



























































