रेल नीरचा तुटवडा, प्रवाशांच्या घशाला कोरड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तापमानाचा चढलेला पारा आणि वाढलेल्या उकाडय़ामुळे उपनगरीय लोकल प्रवाशांची बाटलीबंद रेल नीर पाण्याची मागणी दोन-अडीच लाख लिटरच्या घरात गेली आहे. मात्र रेल्वेच्या अंबरनाथ येथील रेल नीरच्या बॉटल फिलिंग प्लांटमधून दररोज पावणेदोन लाख लिटर पाण्याच्या बाटल्या उपलब्ध होत आहेत. रेल नीरला मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना रेल नीरऐवजी इतर चालू बँडच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे.

मुंबई उपनगरीय लोकलने दररोज सुमारे 70 लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. तसेच लांब पल्ल्याच्या मेल, एक्सप्रेसच्या प्रवाशांची संख्याही लाखाच्या घरात आहे. रेल्वेच्या अधिकृत स्टॉलवर आयआरसीटीसीच्या माध्यमातून पॅक केलेल्या बाटलीबंद पाण्याची विक्री केली जाते. एक लिटर पाण्यासाठी केवळ 15 रुपये मोजावे लागतात. इतर बाटलीबंद पाण्याच्या तुलनेत  रेल नीरची किंमत कमी असल्याने प्रवाशांकडूनही त्याला पसंती दिली जात आहे.