
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यात तापमानाचा पारा वाढला असून विदर्भाचे नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, गोंदिया जिह्यात तापमान 42 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने हे जिल्हे अक्षरशŠ भाजून निघाले आहेत. नवी मुंबईत रविवारी असूनही रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता. त्यामुळे नवी मुंबईत अघोषित संचारबंदी लागल्याचे चित्र दिसत होते.
राज्यात तापमान वाढीमुळे मुंबई, पालघर, ठाणे, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ असा महाराष्ट्राच्या विविध भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भात आज सर्वाधिक तापमान नोंदले गेले. विदर्भातील नागपूरमध्ये 44.3, अकोला 45.5, अमरावती 45.4, वर्धा 44.9, यवतमाळ 43.5 तर गोंदियामध्ये 42.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली.
राज्यात उष्माघाताचे तीन बळी
उष्माघाताने आतापर्यंत राज्यात तिघा जणांचा बळी गेला आहे. यात नांदेडमध्ये एका शेतकऱयाचा तर जळगावच्या अंमळनेरमध्ये एका महिलेचा आणि एका तरुणाचा मृत्यू झाला. नांदेडमध्ये हिमायतनगरमधील विशाल मादसवार (28) या शेतकऱयाचा शेतात काम करून परतल्यानंतर उष्माघातामुळे हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. अंमळनेरमधील रूपाली राजपूत (33) ही महिला अमरावतीमध्ये लग्नसोहळ्याला गेली होती. संध्याकाळी परतल्यानंतर उष्माघातामुळे त्यांना मळमळ आणि उलटय़ांचा त्रास जाणवू लागला. दुसऱया दिवशी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. अंमळनेरच्या भडगावमधील अक्षय सोनार (29) याचा उष्माघातामुळे मृत्यू झाला.

























































