राजर्षी शाहू महाराजांना लोककलावंतांची मानवंदना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामाजिक न्यायक्रांतीचे प्रणेते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना राज्यातील 120हून अधिक लोककलावंतांनी कलेतून मानवंदना देत कृतज्ञता पर्वाचा शानदार समारोप केला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने ऐतिहासिक श्री शाहू छत्रपती मिल येथे 6 ते 14 मेपर्यंत आठ दिवस विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांसाठी नृत्य, चित्रकला, रेखाटन, कॅलिग्राफी, शिल्पकला, पेपरक्रॉफ्ट, मातीकाम (पॉटरी), रंगकाम, मातीशिल्प आदी उपक्रम राबविले गेले. छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावर भाष्य करणाऱ्या अनेक नाट्यछटा, तसेच दर्जेदार, आशयघन चित्रपटही जिल्हा प्रशासनातर्फे मोफत दाखविण्यात आले. सोबत खाद्यजत्रा, आंबा महोत्सव, शस्त्रदालन, बुक स्टॉल्स, कापड विभाग, महिला बचत गटांच्या विविध उत्पादित वस्तूंची विक्री व उत्पादन, आयटी, तसेच ज्वेलरी स्टॉल्स आदी बाबींचा यामध्ये समावेश होता.

दरम्यान, सांगता समारोपप्रसंगी नाशिक येथील आदिवासींचे बोहडा, पालघर येथील तारपा, लावणी, कर्बल, लेझीम, सोंगी मुखवटे, डोल्लू कुनिता (ढोलनृत्य), दिवली, कोळी आदी पारंपरिक लोकनृत्यांद्वारे विविध राज्यांतील कलावंतांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मानवंदना दिली. दरम्यान, छत्रपती शाहूंचे विचार आपल्या आचरणात आणण्यासह जातिभेदाला थारा न देणे हीच छत्रपती शाहू महाराजांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले. 6 मे रोजी 101व्या पुण्यतिथीदिनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना सकाळी 10 वाजता सर्वांनी वाहिलेली 100 सेकंदांची आदरांजली ही संपूर्ण देशासाठी आदर्शवत बाब ठरली, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.

महोत्सवात एक कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल

कृतज्ञता पर्व सांगतानिमित्त ऐतिहासिक श्री शाहू छत्रपती मिलमध्ये जिह्यातील विविध प्रसिद्ध उत्पादनांचे प्रदर्शन भरवून नागरिकांना माफक दरात खरेदीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. आठ दिवसांत एक कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल झाली. सर्वाधिक 35 लाखांची उलाढाल आंबा स्टॉल्समधून, 108 स्टॉल्समधून सुमारे 25 लाख, खाद्यजत्रेत 17 लाख, कापड विभागात 15 लाख, तसेच बुक आणि इतर स्टॉल्सद्वारे सुमारे 20 लाख रुपयांहून अधिकची उलाढाल झाली. उदय गायकवाड, प्रमोद पाटील, आदित्य बेडेकर, प्राचार्य अजेय दळवी, प्रा. डॉ. महादेव नरके, ऋषिकेश केसकर, जयदीप मोरे, डॉ. कविता गगराणी, सुखदेव गिरी, प्रसन्न मालेकर, वसीम सरकवास, संदेश जोशी यांनी संयोजन केले.