
>> श्रीकांत देवळे
आयएसआयकडून अशा प्रकारचे हनी ट्रप लावले जाणे हा प्रकार पूर्वी अपवादात्मक घडायचा. आता तो एक प्रवाह बनला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने या ट्रपमध्ये हिंदुस्थानातील महत्त्वाच्या व्यक्तींना, लष्करी जवानांना, अधिकाऱ्यांना, शास्त्रज्ञांना अडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या अटकेनंतर ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे. त्यांनी नेमकी कोणती माहिती लीक केली आहे, त्यांच्यासोबत आणखी कोण कोण यामध्ये अडकले आहेत याबाबतचे सत्य समोर येणे आवश्यक आहे.
युद्धनीतीमध्ये आपले सामर्थ्य वाढवतानाच शत्रूच्या गोटात शिरून त्यांची रणनीती काय आहे हे समजून घेण्यासाठी गुप्तहेरांचा वापर हजारो वर्षांपासून केला जातो. आपला जीव धोक्यात घालून शत्रूच्या कटाची, हालचालींची बित्तंबातमी आपल्या देशाला पोहोचवणारे गुप्तहेर हे वेशांतर करण्यासारख्या अनेक क्लृप्त्या लढवत असतात. पूर्वीच्या काळात राजा-महाराजांसाठी असे खबरे किंवा गुप्तहेर मोलाची भूमिका पार पाडत असत. आजही जगभरातील सर्वच देश अशा प्रकारच्या गुप्तहेरांच्या माध्यमातून हेरगिरी करत असतात. आधुनिक काळात त्याला नवे आयाम प्राप्त झाले आहेत. विशेषतः माहिती तंत्रज्ञानाचा विस्तार झाल्यापासून छुपे कॅमेरे बसवणे, उपग्रहांमार्फत हेरगिरी करणे, पेगासससारखे सॉफ्टवेअर वापरणे, विविध ऍप्सचा वापर करून माहिती चोरणे यांसारखे प्रकार राजरोसपणे घडताना दिसताहेत. याखेरीज आणखी एक प्रकार गेल्या काही वर्षांत वाढताना दिसत आहे तो म्हणजे हनी ट्रपचा. पहिल्या महायुद्धाच्या काळापासून सुरू झालेल्या हनी ट्रपने इंटरनेट तंत्रज्ञानाचा आणि सोशल मीडियाचा आधार अत्यंत खुबीने घेतला आहे. पाकिस्तान आणि चीनसारखे देश या हनी ट्रपमध्ये हिंदुस्थानच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या व्यक्तींना अडकवण्याचे प्रयत्न कसोशीने करताहेत. 2019 मध्ये हिंदुस्थानचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी याबाबत चिंता व्यक्त केली होती. तसेच सैन्यदलातील अधिकाऱयांना, जवानांना सोशल मीडियापासून लांब राहण्याचे निर्देशही दिले होते. त्यापूर्वी ब्राह्मोस मिसाईल सेंटर आणि डीआरडीओ यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू असलेल्या नागपूरमधील एका प्रकल्पामध्ये कार्यरत असणाऱया नितेश अग्रवाल नावाच्या हिंदुस्थानी शास्त्रज्ञाला अटक करण्यात आली होती. सदर शास्त्रज्ञ आयएसआयच्या हनी ट्रपमध्ये अडकल्याचे समोर आले होते. या जाळय़ात अडकून अग्रवालने ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या संदर्भातील हायटेक माहिती आयएसआयला दिल्याची माहिती उघड झाली होती.
हनी ट्रप अर्थात मधुजाल हा प्रकार नवा नाही. तथापि, आयएसआयकडून अशा प्रकारचे हनी ट्रप लावले जाणे हा प्रकार पूर्वी अपवादात्मक घडायचा. आता तो प्रवाह किंवा ट्रेंड बनला आहे. उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये अच्युत प्रधान नावाचा बीएसएफ जवानही अशाच स्वरूपाच्या ऑपरेशनमध्ये पकडला गेला होता. फेसबुकवरून तो ज्या मैत्रिणीशी चॅटिंग करत होता त्या मैत्रिणीच्या फेसबुकच्या अकाऊंटमध्ये 90 हिंदुस्थानींचा समावेश होता. त्यापैकी काही लष्करातील जवान किंवा अधिकारी होते. राजस्थानमधील अरुण मारवाह नामक हवाई दलाचा एक अधिकारीही हनी ट्रपमध्ये अडकल्याचे उघड झाले होते. त्याने अनेक महत्त्वाचे फोटोग्राफ आयएसआयला दिल्याचे कबूल केले होते. थोडक्यात, या घटना वारंवार घडताहेत.
मध्यंतरी पाकिस्तानी गुप्तचरांच्या हस्तकांना हिंदुस्थानातून गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपावरून पुण्यातील संरक्षण विभागामधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना अटक झाली आहे. कुरुलकर यांच्या ई-मेल देवाणघेवाणीत आढळलेले संशयास्पद ई-मेल पाकिस्तानातील असल्याचे तपासातून पुढे आले आहे. तसेच त्यांच्या सोशल मीडियाद्वारे फोटो, व्हिडीओ आणि फाईल्स शेअर झाल्याचे दहशतवादविरोधी पथकाने कोर्टात सांगितले आहे.
डॉ. कुरुलकरांवरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत किंवा त्यांनीही याबाबतची कबुली दिलेली नाही, परंतु आजवरचा इतिहास पाहता हनी ट्रपच्या प्रकरणात तपास यंत्रणांनी पकडलेल्या संशयितांवरील आरोप हे चुकीचे असल्याचे फारसे कधी घडलेले नाही. त्याचे कारणही तसे आहे. एखाद्या अधिकाऱयाबाबत किंवा जवानाबाबत अशी शंका येऊ लागल्यानंतर त्याच्यावर अप्रत्यक्षपणाने पाळत ठेवली जाते. तसेच त्याचे सोशल मीडिया अकाऊंट तपासले जाते. त्याच्या वर्तणुकीतील बदल, प्रवास, आर्थिक व्यवहार या सर्वांवर नजर ठेवली जाते. त्यातून मिळालेल्या माहितीची सुसूत्रता तपासली जाते. त्यानंतर अटकेचे पाऊल उचलले जाते. प्रदीप कुरुलकर सप्टेंबर 2022 पासून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हेरांच्या संपर्कात होते. त्यांच्या हालचाली आणि वर्तन संशयास्पद वाटल्याने जानेवारी महिन्यात त्यांचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आला होता. त्या वेळी डीआरडीओच्या एका समितीकडे चौकशीसाठी हे प्रकरण सोपविण्यात आले होते.
हनी ट्रपमध्ये साधारणतः सहा प्रकारच्या व्यक्तींना अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसते. लष्करी अधिकारी ः कोणत्याही दलातील कार्यरत अधिकाऱयांना आमिषे दाखवली जातात आणि त्यांना हनी ट्रपमध्ये ओढले जाते. निवृत्त लष्करी अधिकाऱयांनाही गोवण्याचा प्रयत्न त्यात झालेला दिसतो. लष्करामध्ये जाण्यासाठी इच्छुक तरुणांनाही ट्रप केले जात आहे. या मधुजालामध्ये सामान्य माणसाला गुंतवले जात आहे. यासाठी इथल्या गरिबी, बेकारीचा फायदा घेतला जातो. त्यांचा वापर शहरातील महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतींची रेकी किंवा टेहळणी करण्यासाठी केला जातो. या जागांचे स्थान, प्रवेश कसा करता येईल ही माहिती प्रामुख्याने दहशतवादी संघटनांकडून मिळवली जाते. इस्लामाबादेत असणाऱया हिंदुस्थानी दूतावासातील कर्मचाऱयांनाही हनी ट्रपमध्ये फसवले जाते. काही वर्षांपूर्वी या दूतावासातील भाषा विभागातील कनिष्ठ दर्जाच्या तीन अधिकाऱयांना हनी ट्रपमध्ये फसवल्याचे निदर्शनास आले होते. याखेरीज अलीकडील काळात तरुण वैज्ञानिक किंवा डीआरडीओसारख्या संरक्षण संशोधन संस्थांमधील शास्त्रज्ञांनाही हनी ट्रपमध्ये फसवले जात आहे. निशांत अगरवालला 2017-18 चे ‘यंग इंडियन सायंटिस्ट’ हे पारितोषिक मिळाले होते. अशा शास्त्रज्ञांना हेरून त्यांच्याकडून संरक्षणासंदर्भातील महत्त्वाची माहिती शत्रुराष्ट्रे काढून घेत असतात.
अर्थात एक चांगली बाब म्हणजे या हनी ट्रपचा पर्दाफाश होत आहे. यासंदर्भात आपले संरक्षण खाते, गुप्तचर यंत्रणा, एटीएस हे चांगले काम करत आहेत. असे असले तरी या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही दूरदर्शी उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच हनी ट्रपमध्ये अडकलेल्या लोकांना कडक शिक्षा देणे आवश्यक आहे. या गुन्हेगारांवर ऑफिशियल सिक्रेट ऍक्टच्या अंतर्गत कारवाई न करता त्यांना देशद्रोहय़ाच्या कलमांतर्गत कडक शिक्षा दिली गेली पाहिजे, जेणेकरून कोणतीही व्यक्ती संरक्षणसंबंधित माहिती शत्रुराष्ट्राला पुरवण्याचे दुःसाहस करणार नाही.



























































