
मुंबई महानगरपालिकेने नागरिकांसाठी बुधवारपासून कचऱयाच्या तक्रारी करण्यासाठी सुरू केलेल्या 8169681697 या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला आहे. यामध्ये गुरुवारी एकाच दिवशी 319 तक्रारी पालिकेच्या ‘व्हॉट्सअॅप हेल्पलाईन’वर प्राप्त झाल्या. यापैकी फक्त 179 तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. शिल्लक 140 तक्रारींचे निवारण लवकरच करण्यात येईल, असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
नालेसफाईपाठोपाठ मुंबईकरांना कचरा आणि डेब्रिजच्या तक्रारीसाठी 7 जूनपासून ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉट्सअॅप हेल्पलाईन’ची सुविधा 8169681697 या क्रमांकावर देण्यात आली आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत या हेल्पलाईनवर एकूण 319 तक्रारी नोंदविल्या. त्यातील कचरा आणि डेब्रिजशी संबंधित असलेल्या 257 तक्रारींची दखल घेतली असून त्यातील 179 तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. तसेच गुरुवारी दुपारनंतर आलेल्या 78 तक्रारीही लवकरच सोडविण्यात येतील, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, घनकचरा व डेब्रिजबाबत हेल्पलाईनच्या माध्यमातून नागरिकांना थेट तक्रार, सूचना नोंदवण्यासाठी सुविधा मिळणार आहे. दररोज वॉर्ड अधिकारी या तक्रारींवर संनियंत्रण करतील. तसेच आठवडय़ाला आयुक्त तक्रार निवारणाचा आढावा घेतील.


























































