मुंबईकरांच्या पैशाने ‘सीएम हेल्पलाइन’च्या प्रसिद्धीचा घाट, आदित्य ठाकरे यांचा सणसणीत टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकाळात मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना तब्बल 80 प्रकारच्या सुविधा देणारा ‘चॅटबॉट’ उपक्रम सुरू केला. मात्र बेकायदा मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी याच योजनेतील ‘क्लीन मुंबई’ उपक्रमात ‘सीएम’ शब्द घालून ‘सीएम क्लीन मुंबई हेल्पलाइन’ असे नामकरण करून नव्याने लोकार्पण केले. हा प्रकार म्हणजे मुंबईकरांच्या पैशाने ‘सीएम हेल्पलाइन’च्या प्रसिद्धीचा घाट असल्याचा टोला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगावला.

पालिका क्षेत्रातील कोणत्याही ठिकाणी असणारा कचरा, डेब्रीजच्या ढिगाचा पह्टो पाठवल्यास 8 ते 12 तासांत स्वच्छता करण्याची सुविधा देणाऱया उपक्रमाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यासाठी ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉट्सअॅप हेल्पलाइन’ सुरू करण्यात आली. यामध्ये 8169681697 या व्हॉट्सअॅप क्रमांक मुंबईकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र सुरू असलेल्या ‘चॅटबॉट’ उपक्रमात आधीच तब्बल 80 प्रकारच्या सुविधा असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. पालिकेच्या सुरू असलेल्या उपक्रमात मुख्यमंत्र्यांना प्रसिद्धी मिळत नसल्यामुळे नवा उपक्रम सुरू केला का, असा सवालही त्यांनी केला आहे. या उपक्रमाचे नाव ‘क्लीन मुंबई’ असेच योग्य असल्याचे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

‘त्या’ सुविधा बंद केल्या का?
मुंबईकरांच्या सेवेसाठी शिवसेनेच्या पाठपुराव्याने जानेवारी 2022 मध्ये सुरू केलेल्या ‘चॅटबॉट’ उपक्रमात व्हॉट्सअॅप क्रमांकावर विविध प्रकारची माहिती मिळवणे, तक्रारी करण्यासाठी 8999228999 हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही सेवा सुरू असताना पुन्हा बेकायदा मुख्यमंत्र्यांसाठी नव्याने उपक्रमाचे लोकार्पण का केले, असा सवाल करतानाच सुरू असलेला आधीचा उपक्रम बंद केला का, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे सध्याचे मुख्यमंत्री स्वतःच बेकायदा, करप्ट असून ‘क्लीनिंग’ उपक्रमाचे लोकार्पण करतातच कसे, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.