
वादळी पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी होर्डिंग तसेच झाडे कोसळण्याच्या घटना घडतात. बेफिकीरपणे हे होर्डिंग्ज लावण्यात येत असल्याने त्याची गंभीर दखल ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतली आहे. यापुढे होर्डिंग कोसळून जीवितहानी झाल्यास संबंधित मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. शहरातील सर्व होर्डिंग्ज व होर्डिंग्ज टॉवरचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेशही दिले असून त्यात हयगय खपवून घेतली जाणार नाही असे बजावले आहे. आयुक्तांच्या या आदेशानंतर शहरातील बेकायदा होर्डिंग्ज हटवण्याची लगबग तत्काळ सुरू झाली आहे. ठाण्यातील स्टेशन परिसर, नौपाडा, नितीन पाचपाखाडी, वर्तकनगर, माजिवडा नाका, तीन हात नाका,
कळवा, खारेगाव, मुंब्रा, घोडबंदर रोड, दिवा अशा अनेक भागांत मोठमोठी होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत. सध्या वादळ आणि पाऊस यामुळे हे होर्डिंग्ज कोसळण्याची शक्यता आहे. कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांची तत्काळ बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शहरातील होर्डिंग्जचा आढावा घेण्यात आला. पंधरा दिवसांत शहरातील सर्व होर्डिंग्जची स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले असून त्यानंतर हे होर्डिंग्ज सुरक्षित नसल्याचे आढळले तर ते काढण्याची जबाबदारी संबंधित कंपनीवर राहणार आहे.
स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल सादर केल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. महाकाय होर्डिंग्ज कोसळून एखादी दुर्घटना घडली तर होर्डिंग लावणाऱ्या कंपनीच्या मालकावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. परवाना विभागाने शहरातील सर्व बेकायदा होर्डिंग्जचा शोध घ्यावा व तत्काळ कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. मेटल स्ट्रक्चरलवरील होर्डिंग्जदेखील काढून टाकण्याचे आदेश सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.
. तर ठेकेदार काळ्या यादीत
ठाण्याच्या खासगी गृहसंकुलातील धोकादायक झाडे तसेच फांद्या छाटण्याचे काम ठेकेदारामार्फत करण्यात येत आहे. त्याचे दर निश्चित करावेत, ठरलेल्या दरापेक्षा एक रुपया जरी जास्त घेतला तर संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत.



























































