
जगण्याचा नेमका खरा आनंद काय असतो, याचा प्रत्यय मला पंढरीच्या वारीत मिळाला…सांगतोय अभिनेता संदीप पाठक.
हल्ली बहुतेकांचे नेमके काय झालेय माहिती आहे का? छोट्या छोट्या गोष्टी आपण पुष्कळ वेळ घेऊन बसतो. चिमुटभर प्रश्न असतील ते डोंगराएवढे बनवतो. गाडी, बंगला, पैसा, ब्रॅण्डेड कपडे, बँक बॅलन्स, हॉटेलिंग अशा भौतिक गोष्टींमध्ये गुरफटून जातो. पुष्कळ दमतो. या साऱ्यावर मात करत जगण्याचा खरा आनंद नेमका काय असतो याचा प्रत्यय मला ‘जगात भारी पंढरीची वारी’च्या निमित्ताने व ‘विठ्ठल माझा सोबती’ या माझ्या येऊ घातलेल्या चित्रपटाच्या दरम्यान अनुभवायला मिळाला. त्यातील माझी भूमिका साकारताना आंतरिक तृप्ती मिळाली.
वारीत हजारो, लाखो वारकरी पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होताना दिसले. एक आजोबा वारीत दिसले त्यांना म्हटले, ‘‘अहो तुमचे कपडे, सामान कुठे आहे?’’ ‘‘हे काय रे.’’ असे म्हणत एका इवल्याशा पिशवीमध्ये व्यवस्थित घडी केलेला एक कपडय़ाचा जोड त्यांनी दाखवला. मी म्हटले, ‘‘अठरा दिवस पुरतील?’’ ते हसून म्हणाले, ‘‘अरे काय करायचे रे राजा? एक अंगावरती आहे घालायला. तो धुऊन वाळत टाकायचा. तो वाळेपर्यंत दुसरा अंगावरती घालायचा. माणसाला लागते तरी किती?’’ दोन वाक्यांत त्यांनी बोलणे संपवले. खरंच हा विचार किती साधा पण लाखमोलाचा आहे. थोडक्यात समाधान मानणे हे खूप महत्त्वाचे. अजून एक त्यांच्याशी बोलताना कळले की, फक्त 250 रुपये होते त्यांच्याकडे. मी म्हटले, ‘‘आजोबा 250 रुपयांत वारी कशी काय करणार?’’ ते छान हसून मला म्हणाले, ‘‘अरे बाळा ज्या गावात थांबतो तिथे भक्तांकडे आसरा मिळतो. खायला अन्न पाणी मिळते. जगायला किती लागते रे शेवटी? मला खात्री आहे की अंदाजे 80 रुपये उरतील आणि ते मी माझ्या मुलाला परत देईन.’’ त्यांच्या हा जगण्याच्या जमाखर्चाचा हिशोब ऐकून मी निःशब्द झालो व ज्येष्ठ लेखक व. पु. काळे यांचे एक वाक्य मला आठवले, ‘खर्च झाल्याचे दुःख नाही, पण हिशोब लागला नाही की त्रास होतो’ आणि इथे आजोबांचे जे खर्चाचे गणित होते ते अजब होते. जगण्याच नवा जमाखर्च आजोबांनी शिकवला.
सासवडला सोपानकाका मंदिरामध्ये एका माऊलीची गाठ पडली. मी म्हटले, ‘‘माऊली, देवळाच्या अंगणात झोपलात? पाऊस आला तर?’’ ते म्हणाले, ‘‘ही आहे ना ताडपत्री ती अंगावरती घ्यायची की झाले. बाकी सर्व पांडुरंग पाहून घेईल.’’ किती ती विठ्ठलावर श्रद्धा आणि किती हा सकारात्मक विचार!
आयुष्यात मी किती कमवले? काय कमवले? याचा हिशोब मी करत नाही, पण जर भविष्यात हिशोबाची वही घेऊन बसलो तर एक मात्र निश्चित लिहीन की, वारीने मला माझ्यातला ‘मी’ शोधून दिला. एका वेगळय़ा अर्थाने वैचारिकरीत्या व भावनिकरीत्या समृद्ध…श्रीमंत झालेला!
नितळ हास्याचे रहस्य काय…
हे सगळे जेव्हा मी अनुभवतो तेव्हा मला कळते की, इतकी सारी सुखे आपल्या पदरात असूनसुद्धा आपल्या चेहऱ्यावरचे हसू या वारीतील माऊलीच्या हसण्याच्या जवळपाससुद्धा का पोहोचू शकत नाही. विचार केला तेव्हा कळले त्या नितळ हास्याचे रहस्य एकच…वारीतील प्रत्येक माऊलीच ‘पोट आणि मन’ एका निर्व्याज निरपेक्ष आनंदाने भरलेले असते आणि ती तृप्तीच हसण्याच्या रूपात त्यांच्या चेहऱ्यावर बागडत असते.
शब्दांकन ः निनाद पाटील



























































