इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कीर्तनात लिंगभेदाबाबत केलेल्या एका विधानामुळे इंदुरीकर महाराज यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिले आहेत. दरम्यान, या आदेशाला इंदुरीकर महाराज सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत.

‘सम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगा आणि विषम तारखेला स्त्रीसंग केल्यास मुलगी होते,’ असे विधान इंदुरीकर महाराजांनी केले होते. त्याविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नगर जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती. तिथे कारवाईची मागणी फेटाळण्यात आल्यानंतर अंनिसने उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. आज यावर सुनावणी झाली असता इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

सर्वोच्च न्यायालयात जाणार

महाराजांचे वक्तव्य प्राचीन हिंदू ग्रंथांवर आधारित असून या वक्तव्याचा गर्भलिंग निदान वा चाचणी याच्याशी कोणताही संबंध नाही. त्याची जाहिरात करण्याचा कोणताही हेतू नाही. या वक्तव्याने कोणत्याही कायद्याचे उल्लंघन होत नाही. त्यामुळेच आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे इंदुरीकर यांच्या वकील अॅड. राधिका नावंदर यांनी सांगितले. आम्हाला त्यासाठी उच्च न्यायालयाने चार आठवडय़ांची मुदत दिली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.