
>> डॉ. प्रीतम भि. गेडाम
शिक्षण हा मानवी जीवनाचा आधार आहे. मात्र मुलांना पुस्तकांऐवजी जबाबदारीचे ओझे दिले तर ते त्यांच्या विकासापासून वंचित राहतील, त्यांचा निरागसपणा नष्ट होईल. त्यांचे हक्क हिरावून घेतले जातील. जीवन अनमोल आहे, बालमजुरीमुळे मुलांचे भविष्य नष्ट होते. मुलांनी शाळेत जायचे असते, कामाच्या ठिकाणी नाही. बालमजुरी हा शिक्षणात मोठा अडथळा ठरतो. शारीरिक, मानसिक, सामाजिक, आरोग्याच्या विकासातही अडथळा आणतो. निरागस बालपण वाचवण्यासाठी आपल्याला मोठी जनमोहीम राबवावी लागेल.
बालमजुरी हा कायदेशीर गुन्हा असून एक सामाजिक शाप आहे, जो मुलांचा शाळेत जाण्याचा हक्क हिरावून घेतो आणि गरिबी वाढण्यास हातभार लावतो. अनेक बाल कामगार प्रतिबंधक कायदे आणि जनजागृती करूनही बालमजुरी संपत नाही. युनायटेड नेशन्सची उपकंपनी म्हणून काम करणारी आंतरराष्ट्रीय कामगार संघटना बालमजुरीची व्याख्या अशी करते. बालमजुरी हे असे काम आहे, जे मुलांचे बालपण, त्यांची क्षमता आणि त्यांचा सन्मान हिरावून घेते आणि ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक विकासास हानी पोहोचते. ही समस्या पुढे अनेक गंभीर सामाजिक समस्यांना जन्म देते. दरवर्षी 12 जून रोजी जगभरात बालमजुरीविरुद्ध जनजागृतीसाठी ‘आंतरराष्ट्रीय बालमजुरी विरोधी दिन’ साजरा केला जातो. या वर्षी यूएनद्वारे 2023 ची थीम ‘सर्वांसाठी सामाजिक न्याय आणि बाल कामगार समाप्ती’ अशी आहे. बालमजुरीविरुद्ध आपण सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे.
माणसाच्या संपूर्ण आयुष्यातील निःस्वार्थ आणि आनंदी काळाला बालपण म्हणतात, तेव्हा मुले ही ओल्या मातीसारखी म्हणजेच निराकार असतात. त्यांना योग्य वातावरणात चांगले शिक्षण आणि संस्कार देऊन समाजातील जबाबदार नागरिक आणि कर्तव्यदक्ष मानव बनवले जाते, जेणेकरुन मुले मोठी होऊन स्वतःचे, समाजाचे, देशाचे आणि संपूर्ण मानवजातीचे कल्याण व विकास करण्यास हातभार लावतील. लहानपणी मुलांनी घेतलेले शिक्षण त्यांना जीवन विकासाचा एक उत्कृष्ट मार्ग मोकळा करून देते. शिक्षण त्यांना परिपूर्ण बनवते आणि जीवनात सतत प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्यास प्रेरित करते. त्यामुळे व्यक्तीच्या विकासाबरोबर समाजाचा आणि देशाचाही विकास होतो. शिक्षण हा मानवी जीवनाचा आधार आहे. मात्र मुलांना पुस्तकांऐवजी जबाबदारीचे ओझे दिले तर ते त्यांच्या विकासापासून वंचित राहतील, त्यांचा निरागसपणा नष्ट होईल. त्यांचे हक्क हिरावून घेतले जातील. जीवन अनमोल आहे, बालमजुरीमुळे मुलांचे भविष्य नष्ट होते. मुलांनी शाळेत जायचे असते, कामाच्या ठिकाणी नाही. बालमजुरी हा शिक्षणात मोठा अडथळा ठरतो. शारीरिक, मानसिक, सामाजिक, आरोग्याच्या विकासातही अडथळा आणतो. निरागस बालपण वाचवण्यासाठी आपल्याला मोठी जनमोहीम राबवावी लागेल.
युनिसेफ इंडिया आणि इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या मते, 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार हिंदुस्थानात बाल कामगारांची संख्या 1.01 कोटी आहे, त्यापैकी 5.6 दशलक्ष मुले आणि 4.5 दशलक्ष मुली आहेत. हिंदुस्थानात 4.27 कोटींहून अधिक मुले शाळाबाह्य आहेत. हिंदुस्थानातील एकूण काम करणाऱ्या मुलांपैकी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश ही पाच राज्ये मिळून सुमारे 55 टक्के मुले आहेत. ‘सेव्ह द चिल्ड्रेन, 2016’ नुसार, उत्तर प्रदेशमध्ये बाल कामगारांची सर्वाधिक संख्या आहे. हिंदुस्थानातील 20 टक्क्यांपेक्षा जास्त बालमजूर एकट्या या राज्यांतील आहेत. कैलाश सत्यार्थी फाऊंडेशनच्या अहवालानुसार आणि 2011च्या जनगणनेच्या अंदाजानुसार चालू वर्ष 2023 मध्ये हिंदुस्थानात 78 लाख बाल कामगार असतील, ज्यामध्ये मुले आणि मुलींचा वाटा अनुक्रमे 57 टक्के आणि 43 टक्के असेल. बालमजुरी वाढवण्यात कोरोना कालावधीने विशेष योगदान दिले आहे.
जागतिक स्तरावर एकूण 152 दशलक्ष मुले (88 दशलक्ष मुले आणि 64 दशलक्ष मुली) बालमजुरीत असल्याचा अंदाज आहे, जे जगभरातील सर्व दहा मुलांपैकी एक आहे. युनिसेफने म्हटले आहे की, जगातील सर्वात गरीब, कमी विकसित देशांमध्ये पाचपैकी एकपेक्षा जास्त मुले बालमजुरीमध्ये गुंतलेली आहेत. 2012 मध्ये जागतिक स्तरावर बाल कामगारांची संख्या 168 दशलक्ष आहे. आशिया आणि पॅसिफिक प्रदेशात अजूनही बालमजुरांची सर्वाधिक संख्या सुमारे 78 दशलक्ष किंवा 9.3 टक्के आहे. उप-सहारा आफ्रिका हा प्रदेश असा राहिला आहे, ज्यामध्ये 59 दशलक्ष बालमजूर आहेत, अर्थात 21 टक्क्यांपेक्षा जास्त. जागतिक स्तरावर सर्वात जास्त बालमजूर कृषी क्षेत्रात आढळू शकतात. म्हणजे 9.8 कोटी आणि सेवा क्षेत्रात 5.4 कोटी, उद्योगक्षेत्रात 1.2 कोटी बालमजूर आहेत. युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड युनिसेफच्या मते, तीन लाखांहून अधिक बाल सैनिकांना सशस्त्र संघर्षात भाग पाडले गेले आहे.
बालमजुरी नष्ट करण्याच्या लढ्यात सरकारला मदत करण्याकरिता युनिसेफ, केअर इंडिया, कैलाश सत्यार्थी चिल्ड्रेन फाऊंडेशन, ग्लोबल मार्च अगेन्स्ट चाइल्ड लेबर, स्माईल फाऊंडेशन, डॉन बॉस्को बालप्रफुलता, सेव्ह द चिल्डेन, चाइल्ड राइट अँड यू, हँड इन हँड इंडिया, बचपन बचाओ आंदोलन, तलाश असोसिएशन इत्यादी एनजीओ काम करत आहेत. हँड इन हँड इंडिया एनजीओ, ज्याने तीन लाखांहून अधिक मुलांना (माजी बाल कामगार) पुन्हा शाळेत पाठवले. बालमजुरीची कारणे कोणतीही असोत, पण बालमजुरी हा गुन्हा आहे. बालमजुरी निर्मूलनासाठी शासनाने विविध कायदे, धोरणे व कार्यक्रम सुरू केले आहेत. शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. बालमजुरी रोखण्यासाठी सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने पेन्सिल पोर्टल तयार केले आहे. बाल कामगार कुठेही दिसल्यास पेन्सिल पोर्टलवर त्वरित लॉगइन करा आणि बाल कामगार संबंधित तक्रारींसाठी ऑनलाइन तक्रार नोंदवा किंवा 1098 हेल्पलाइन नंबरवर कॉल करा, अन्यथा आपण जवळच्या पोलीस स्टेशनशीदेखील संपर्क साधू शकता. आपली जाणीव एखाद्या निष्पापाचे भविष्य उज्ज्वल करू शकते.





























































