अमेरिकेनंतर पंतप्रधान मोदी इजिप्तच्या वाटेवर, 11व्या शतकातील ‘अल-हकीम’ मशिदीला भेट देणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra Modi) इजिप्तच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दोन दिवसीय दौऱ्याची सुरुवात शनिवारपासून होणार असून यादरम्यान मोदी 11व्या शतकातील ‘अल-हकीम’ मशिदीला (Al-Hakim Mosque) भेट देणार आहेत. दोन दिवसीय दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी हा भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आला आहे. जवळपास अर्धा तास ते या मशिदीमध्ये घालवणार आहेत.

कैरोमधील या मशिदीचे नाव 16व्या फातिमीद खलीफा अल-हकीम द्वि-अम्र अल्लाह (985-1021) यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. मशिदीचे निर्माणकार्य अल-हकीम द्वि-अम्र अल्लाह यांचे वडील खलीफा अल-अजीज बिल्लाह यांनी 10व्या शतकाच्या शेवटी सुरू होते. पुढे अल-हकीम यांनी 1013मध्ये ते पूर्ण केले. या मशिदीला अल-अन्वर नावानेही ओळखले जाते. कैरो शहरातील ही दुसरी सर्वात मोठी आणि चौथी सर्वात जुनी मशिद आहे.

अल-हकीम मशिदीचे क्षेत्रफळ 13 हजार 560 चौरफ मीटर आहे. मशिदीच्या उत्तर आणि पश्चिम कोपऱ्यात दोन मिनार आहेत. या मशिदीला 11 दरवाजे आहेत. मशिदीच्या अंगणात आयताकृती स्तंभ आणि प्रार्थना सभागृह आहे. 13व्या शतकामध्ये आलेल्या भूकंपामध्ये या मशिदीचे नुकसान झाले होते. पुढे बोहरा समाजाने याचे नुतनीकरण केले.

मोदींनी आतापर्यंत जगभरातील ‘या’ मशिदींना दिलीय भेट

  • 2015मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएईच्या दोन दिवसीय दौऱ्यावर गेले होते. येथे त्यांनी अबुधाबीतील ऐतिहासिक शेख जायद ग्रँड मशिदीला भेट दिली होती. यूएईमधील ही तिसरी सर्वात मोठी मशिद असून येथे मोदींनी सेल्फीही घेतली होती.
  • 2017मध्ये म्यानमारच्या दौऱ्यावर गेलेल्या मोदींनी यंगून येथील बहादूर शाह जफरच्या मजारीला आणि मशिदीला भेट दिली होती.
  • 2018मध्ये मोदी ओमानच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात त्यांनी मस्कटमधील सुल्तान कबूस ग्रँड मशिदीला भेट दिली होती. ओमानमधील ही सर्वात मोठी मशिद असून याची निर्मिती हिंदुस्थानी दगडांपासून करण्यात आलेली आहे.
  • 2018मध्ये सिंगापूर दौऱ्यावर गेलेल्या मोदींनी पुरातन चिलुआ मशिदीला भेट दिली होती.
  • 2018मध्ये मोदी इंडोनेशियाच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात त्यांनी तत्कालिन राष्ट्रपतींसोबत इस्तकलाल मशिदीला भेट दिली होती. दक्षिण-पूर्व आशियातील ही सर्वात मोठी मशिद आहे.