
>> प्रवीण धोपट
शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये फंडामेंटल स्टडी गरजेची आहे. म्हणजे कंपनीच्या मुळाशी जाऊन केलेला अभ्यास. कंपनीचा सध्याचा किंवा चालू तिमाहीचा परफॉर्मन्स कसा आहे हे कळणे सततच्या अभ्यासातूनच शक्य होते. फंडामेंटल स्टडीचे काही महत्त्वाचे मुद्दे पाहू.
कंपनीवर असलेले कर्ज
कोणतीही कंपनी असो, वरून दिसणारे चित्र वेगळे आणि आकर्षक असू शकते. कंपनीवर असलेले शॉर्ट टर्म किंवा लॉन्ग टर्म कर्ज किती आहे आणि कंपनीची कर्जाच्या परतफेडीची स्थिती काय आहे? याचा विचार गुंतवणूकदाराने करणे आवश्यक आहे. कंपनीचा डेब्ट टू इक्विटी रेशो किती आहे हे तपासणे आवश्यक असते.
फ्री कॅश फ्लो
कॅपिटल एक्सपेंडिचरनंतर कंपनीकडे किती कॅश फ्लो शिल्लक आहे, याचा विचार आवश्यक असतो. पॉझिटिव्ह कॅश असेल तर कंपनी वाढीसाठी गुंतवणूक करू शकते, त्याचप्रमाणे आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देऊ शकते. तसेच आपल्यावरील कर्ज कमी करू शकते.
गुंतवणुकीवरील परतावा
कंपनी आपल्या गुंतवणुकीदारांना प्रॉफिट शेअरिंग देत असेल तर याचा असा अर्थ कंपनी स्वतः प्रॉफिट मिळवते आहे. असेटवर, इक्विटीवर परतावा मिळत असेल तर कंपनी आपल्या भांडवलाचा उपयोग योग्य प्रकारे करते आहे.
स्पर्धेतही टिकून राहणे
वस्तू बनवणे हे कौशल्य आहेच, पण वस्तू विकणे ही कला आहे. विक्रीमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी कोणत्या युक्त्या वापरते हे महत्त्वाचे ठरते. कंपनीकडे असलेले पेटंट, तंत्रज्ञान, ब्रँड, वितरणाची साखळी या सगळय़ा गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात.
सरकारी नियमांचे पालन
केवळ व्यवसायात नफा मिळावा म्हणून पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून जर एखादी कंपनी व्यवसाय करीत असेल तर ती आज ना उद्या अडचणीत येऊ शकते, परंतु पर्यावरणासंबंधी सर्व नियम पाळून व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे भविष्य चांगले आहे हे समजायला हरकत नाही.
ग्राहक आणि मार्केट डिमांड
वर्षानुवर्षे आपले ग्राहक टिकवून ठेवण्यात जी कंपनी यशस्वी होते ती कंपनी एक प्रकारे आपल्या ग्राहकांचा विश्वास टिकवून ठेवते. कंपनी नवीन कोणते प्रॉडक्ट बाजारात आणते आहे याकडे समाधानी ग्राहक लक्ष ठेवून असतात. ग्राहकांची मतं, सर्वेक्षण यातून अशा कंपनीला ग्राहक पहिली पसंती बहाल करतात.
व्हॅल्युएशन मेट्रिक्स
कंपनीची स्टॉक प्राइस ही एकमेव गोष्ट ग्राहकाला आकर्षित करीत नाही. प्राइस योग्य आहे की अयोग्य, हे खालील गोष्टींवर अवलंबून असते. प्राइस टू आर्निंग रेशो (पी/ई रेशो), प्राइस टू सेल रेशो (पी/एस रेशो), प्राइस टू बुक रेशो (पी/बी रेशो) आणि डिस्काऊंटेड कॅश फ्लो (डीसीएफ) या सगळय़ांचा एकत्रित विचार म्हणजे कंपनीची प्राइस अंडरव्हॅल्यूड आहे की ओव्हरव्हॅल्यूड आहे हे नेमकेपणाने समजते.
फंडामेंटल स्टडी म्हणजे वेळ देणे, संशोधन करणे. काही ट्रेडर अभ्यास स्वतः करणे पसंत करतात, तर काही ट्रेडर फायनान्शिअल ऍडव्हायजरची मदत घेतात, परंतु इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेताना या दोन्हींपैकी एक गोष्ट करायलाच पाहिजे.
(लेखक दीपंकर फिनकॅप इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. येथे गुंतवणूक सल्लागार आहेत)




























































