
>> चंद्रसेन टिळेकर
महाराष्ट्रातील जनमानसाचा विशेष लोभ असलेले साहित्यिक म्हणजे पु. ल. देशपांडे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, लेखनाचा, साहित्याचा प्रभाव आजही वाचकांवर आहे. परंतु त्यांचे विवेकी विचार, बुद्धिप्रामाण्यवाद, तार्किकता स्वीकारताना मात्र हा वर्ग कमी पडतो हेच जाणवते.
मराठी साहित्यात अनेक उत्तम सारस्वत होऊन गेले, पण अलीकडच्या काळात मराठी जनांचा विशेष लोभ जडला तो खास दोन साहित्यिकांवर. एक म्हणजे आचार्य अत्रे आणि दुसरे पु. ल. देशपांडे! अत्र्यांचा 30-40 वर्षे महाराष्ट्रावर प्रखर प्रभाव होता. अत्र्यांच्याच शब्दांत सांगायचं तर ‘असा माणूस दहा हजार वर्षांत झाला नाही’ असे मराठी माणूस अत्र्यांबद्दल काहीशा गर्वाने म्हणायचा. हे झालं आचार्य अत्र्यांबद्दल, पण पुलंबद्दल काय?
न स्वीकारलेले पु. ल.
अत्र्यांच्या गुणांचे (आणि काही प्रमाणात अवगुणांचेही) अनुकरण करण्याचा प्रयत्न झाला तसे पुलंच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्यांच्या साहित्यातील विचारांचा मराठी माणसाने, विशेषत त्यांना ‘महाराष्ट्राचे लाडके दैवत’ ही उपाधी प्रदान करणाऱ्या त्यांच्या वाचकांनी स्वीकार केला का? स्पष्टपणे सांगायचे झाले तर मुळीच नाही! वैषम्य या गोष्टीचे वाटते की, पुलंना डोक्यावर घेणारा वाचक वर्ग हा बहुतांशी सुविद्य, सुशिक्षित अशा पांढरपेशा वर्गातील होता, पण या वर्गाने पुलंना जरी लाडके दैवत म्हणून आपल्या डोक्यावर घेतले तरी त्यांच्या साहित्यातील बुद्धिप्रामाण्यवादी विचार मात्र डोक्यात जाऊ दिले नाहीत. आपल्या समाजातील अविवेकी विचारांची खिल्ली अत्यंत समर्थपणे पुलंनी आपल्या विनोदी लेखणीने उडवली आहे. मग ती एअरकंडिशनमधली बुवाबाजी असो, अतिरेकी देवभक्ती असो, स्वार्थापोटी केलेला नवस असो किंवा फॉरेन रिटर्न उच्चविद्याविभूषित लग्नाळू तरुणाने पत्रिका अन् स्वजातीचा धरलेला हट्ट असो – त्यांची लेखणी आपले विनोदाचे व्रत गुंडाळून उद्वेगाने म्हणते, “माझ्या देशात एवढे संत जन्माला येण्याऐवजी शस्त्रािढयेच्या वेळी होणाऱ्या वेदना सुसह्य व्हाव्यात म्हणून अनेस्थेशियाचा शोध लावणारा संशोधक जन्माला आला असता तर मला अधिक आनंद झाला असता.”
पु.ल. आणि पांढरपेशी बुवाबाजी
आपल्या समाजात बुवाबाजीचा रोग तसा पुराण काळापासून आहे. सर्व स्तरांवर हा रोग दिसत असला तरी प्रामुख्याने समाजातील सर्व दृष्टीने जो दुर्बल वर्ग असतो तो आपले दुःख कोणीतरी मांत्रिक, तांत्रिक किंवा ज्याला बोलीभाषेत भगत म्हणतात, तो दूर करील यावर विश्वास ठेवणारा असतो. शिक्षित समाज मात्र असल्या गोष्टींपासून दूर राहिल्याचे आतापर्यंत आपल्याला दिसत होते. पण गेल्या 60-70 वर्षांत पांढरपेशा वर्गालाही या अंधश्रद्धेची लागण झालेली दिसते. फरक एवढाच की, इथे मांत्रिक किंवा भगताऐवजी त्याचे रूपांतर गुरू, सद्गुरू, स्वामी, माता यांच्यात झालेले आपल्याला दिसते. तसेच एखाद्या झोपडीऐवजी प्रशस्त अशा वातानुकूलित हॉलमध्ये सुशिक्षित भक्तांचा दरबार भरलेला असतो. पु. ल. याला ‘एअरकंडिशन अध्यात्म’ असे नाव देतात आणि तिथे चाललेल्या दांभिकतेची टोपी कशी उडवतात ते त्यांच्या ‘असा मी असामी’ या बहारदार एकपात्री कार्पामात पूर्वी आपल्याला पाहायला मिळायचे. पुलंचे ‘या देशात कुंभार व्हा, गाढवांना तोटा नाही’ हे गाजलेले सत्यवचन या आध्यात्मिक ढोंगबाजीतूनच निर्माण झालेले. बुवा, महाराजांच्या नादी लागलेल्या माणसांबद्दल पु. ल. म्हणतात,
“एकदा माणसाचा स्वतवरचा विश्वास उडाला की, तो बुवाबाजीच्या नादी लागतो!” आश्चर्य म्हणजे गेल्या तीन-चार दशकांत तर बुवा, बापू, महाराज यांचे अमाप पीक पुरोगामी महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर आले असून तितक्याच मोठय़ा प्रमाणावर पांढरपेशा वर्ग त्यांच्या पायाशी बसलेला दिसतो. हे तर मोठे दुश्चिन्ह आहे. कारण मध्यमवर्ग हाच कुठल्याही समाजाचा असतो, पण पु. ल. म्हणतात, “तसा या वर्गाचा स्वतवरचा विश्वास उडालेला असेल तर ही एक प्रकारे तुम्हा-आम्हा सर्वांना धोक्याची सूचनाच आहे.”
पु. ल. आणि देव अन् देवभक्ती
तसं पाहायला गेलं तर जगभर आस्तिकांचेच साम्राज्य आहे. मग आपला देश तरी याला अपवाद कसा असेल? देवाचे अस्तित्व हा अनेकांच्या दृष्टीने संवेदनशील विषय आहे, श्रद्धेची बाब आहे. म्हणूनच देवभक्तीच्या बाबतीत कितीही अतिरेक झाला तरी भली भली जाणकार मंडळी त्या बाबतीत मौन बाळगतात. बुद्धिवादी पांढरपेशा वर्गही त्यात आलाच. पु. ल. मात्र याबाबतीत कसलीच भाडभीड ठेवीत नाहीत. एके ठिकाणी ते म्हणतात, “जगातले बरेचसे देश हिंडून आल्यावर माझी खात्रीच पटली आहे की, आपल्या देशात देवाचे जेवढे लाड होतात तेवढे जगात कुठेही होत नाहीत. इथल्या दुष्काळातदेखील गणपतीच्या मोदकांची संख्या एकवीसच्या खाली गेली नव्हती.”
पु. ल. आणि पुनर्जन्म, नवस इत्यादी
नवस बोलणे आणि नंतर तो फेडीत बसणे हा प्रकार अधिकतर समाजाच्या कनिष्ठ वर्गात असला तरी सुशिक्षित समाजही त्यापासून अलिप्त नाही. एखाद्या देवीला “मला अमुक तमुक मिळू दे, मी तुझी खणानारळाने ओटी भरेन,” हे आश्वासन म्हणजे नवसाचाच प्रकार. मुंबईसारख्या पुढारलेल्या शहरातल्या सार्वजनिक गणेशोत्सवात “आमचा गणपती नवसाला पावतो” असल्या गर्जना कशाच्या द्योतक आहेत? याच मुंबईत एका देवीला आपल्या दुखऱ्या अवयवाची प्रतिकृती करून वाहिल्यास तो अवयव बरा होतो अशी श्रद्धा आहे. या श्रद्धेचीही खिल्ली पुलंनी ज्या मिश्कील शैलीत उडवली आहे. पु. ल. अत्यंत परखडपणे लिहितात की, “पूर्वजन्म-पुनर्जन्म असल्या थोतांडावर माझा विश्वास नाही. धूर्त धर्ममार्तंडांनी पोट भरण्यासाठी निर्माण केलेल्या या कल्पना आहेत.”
दिशाहीन मध्यमवर्ग
अनिष्ट रूढी, दुष्ट परंपरा, घातक श्रद्धा या समाजाच्या सर्वच स्तरांत असतात. उच्च समाजाचे त्यामुळे फारसे बिघडत नाही, पण अशिक्षित समाजाचा पाय मात्र या अंधश्रद्धांमुळे बुडत्याच्या पायाप्रमाणे खोलातच जात असतो. बुद्धिजीवी पांढरपेशा मध्यमवर्गही आज धर्म अन् संस्कृतीच्या नावाखाली मध्यमयुगीन काळातल्या कल्पना उराशी बाळगण्यात धन्यता मानू लागला आहे. आपल्या समाजाला विवेकी विचारांचे, वैज्ञानिक वृत्तीचे वावडे आहे. आपल्या समाजात भक्तीला तर उधाण आले आहे, त्याला उद्देशूनच गमतीने पु. ल. म्हणतात, “आई अंबाबाईच्या कृपेनेच महाराष्ट्र बुद्धिप्रामाण्यवादी आहे.” पुढे ते असेही म्हणतात, “पूर्वजन्म, प्रारब्धयोग, ग्रहयोग, कर्मसिद्धांत असल्या गोष्टी आमच्या सुशिक्षितांचीही ज्ञानेंद्रिये बंद पाडतात. मग त्यापुढे कसले प्रबोधन आणि कसले परिवर्तन!”
थोर व्यक्तींचा पराभव त्यांचे अनुयायीच करतात असा प्रवाद आहे. त्याच न्यायाने पुलंच्या बुद्धिप्रामाण्यवादी विचारांचा पराभव आमच्या बुद्धिजीवी सुशिक्षित मध्यमवर्गाने केला आहे हेच खरे!
(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत)




























































