
अपघातानंतर दोन कार भल्या मोठय़ा खड्डय़ात कोसळल्याची घटना आज सायंकाळी ठाण्याच्या मानपाडय़ात घडली. गाडी मागे घेत असताना नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र रहिवाशांनी वेळीच धाव घेत गाडय़ांमध्ये अडकलेल्या दोन महिलांची सुटका केल्याने त्यांचा जीव बचावला. मानपाडा, खेवरा सर्कलजवळ तळ अधिक 26 मजली ब्रसिलिया बिल्डिंग आहे. त्याच्या तळमजल्यावरील पझल पार्किंगमध्ये केलेल्या विराज गोसावी यांच्या गाडीला शैलेश चौधरी यांच्या गाडीची धडक बसली. कार मागे घेत असताना ही घटना घडली असून अपघातानंतर दोन्हीही गाडय़ा सेफ्टी बॅरीगेटचे पत्रे तोडून बाजूच्या बांधकाम सुरू असलेल्या पझल पार्किंगच्या टाकीसाठी खोदलेल्या खड्डय़ामध्ये उलटल्या. यावेळी अपघातग्रस्त गाडय़ांमध्ये अडकलेल्या दोन महिलांना रहिवाशांनी वेळीच बाहेर काढत त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.




























































