प्रकल्पग्रस्ताचे बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्यावर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर पोलीस दलात भरतीसाठी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त या आरक्षित जागांवर भरतीसाठी आलेल्या तरुणाने प्रकल्पग्रस्ताचे बनावट प्रमाणपत्र सादर केले. त्यामुळे या युवकावर तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

आनंद काकासाहेब खरात (रा. बावणे पांगरी, जि. जालना) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. जिल्हा पोलीस दलात गेल्या दोन महिन्यांपासून पोलीसभरती प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत जिल्हा पोलीस दलात प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातून अंतिम निवड यादीत समावेश करण्यात आलेल्या सात उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्याची जबाबदारी फिर्यादी सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्यावर होती. त्यांनी सर्व उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी गावपातळीवर जाऊन केली. त्यावेळी आनंद खरात याने सादर केलेले ‘प्रकल्पग्रस्त’ प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले.

त्याने प्रमाणपत्रात त्याच्या आजोबांची जमीन मंगळूर (ता. माजलगाव, जि. बीड) येथील प्रकल्पात संपादित केली असल्याचे नमूद केले होते. मात्र, त्याने नमूद केलेले क्षेत्र हे दुसऱयाच एका मृत व्यक्तीच्या नावे असल्याचे आढळून आले. तसेच मंगळूर गावातील ग्रामसेवक व कामगार तलाठी यांनी आनंद खरात या गावचा रहिवासी नसल्याचे सांगितले. या सर्व कागदपत्रांच्या पडताळणीत आनंद खरात याने प्रकल्पग्रस्ताचे बनावट प्रमाणपत्र सादर करून पोलीस दलासह शासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.