म्हाडाच्या मुंबईतील घरांची सोडत ऑगस्टमध्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4082 घरांसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया नुकतीच संपली आहे. अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची अंतिम यादी 24 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, तर घरांसाठीची सोडत ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात काढली जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे.

म्हाडाच्या घरांसाठी मुंबईकरांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून जवळपास सवा लाख ऑनलाईन अर्ज आले आहेत. सदर अर्जाची अंतिम यादी 24 जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे प्रशासनाने आधीच जाहीर केले आहे. मात्र लॉटरी कधी काढली जाणार हे स्पष्ट केले नव्हते. त्यामुळे अर्जदारांमध्ये काहीसा संभ्रम आहे. मात्र मुंबई मंडळाने ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात सोडत काढण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

त्यामुळे अर्जधारकांची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोडतीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची वेळ मिळाल्यानंतर मंडळाकडून लवकरच सोडतीची तारीख जाहीर होण्याची शक्यता असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.