
>>महेंद्र पाटील
संध्याकाळच्या सावल्या पुन्हा आपल्याला लांब नेऊ लागतात. आपलीच सावली आपल्यापेक्षा लांब दिसू लागते. याच वेळी आपलं मनसुद्धा आपल्यापासून खूप लांब लांब जाऊ लागतं. त्या मनाला कसला तरी शोध असतो. त्या शोधात ते मन दूरचा प्रवास करत जातं, पण शोध काही संपता संपत नाही. संध्याकाळची अनामिक हुरहुर, मनात माजणारं काहूर, अस्वस्थ करणाऱया सावल्या, मनात घर करून राहणाऱया आठवणी आणि नदीकिनारी शांतपणे बसून कुणाची तरी वाट पाहत बसणं… यातून एक गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे मनाला कायम खऱया निष्पाप, निर्मळ प्रेमाचा शोध असतो. त्याच्याच शोधात मन दूर दूर जात असतं. सरते शेवटी मनात काहीतरी हुरहुर राहून जातेच. असं प्रत्येक प्रवासाच्या शेवटी वाटत राहतं. कारण प्रेमाचं स्वरूप, प्रेमाची व्याख्या, प्रेमाची व्याप्ती या गोष्टी कधीच कुणी सांगू शकत नाही आणि त्याचा कधी अंदाजही येत नाही. तरीही आपण आपल्या मनात ते जपून ठेवतो कायम आणि त्याच जपलेल्या प्रेमाच्या ओढीने आपण त्या मनासाठी एक सखा किंवा एका सखीच्या शोधात असतो, परंतु या गर्दीत कधी ओळख पटते तर कधी पटत नाही. आपली बुद्धीसुद्धा आपल्या मनाचं ऐकून घेत नाही आणि अजून पुढचा प्रवास करायला भाग पाडते.
कधी निसर्ग खुणावत असतो तर कधी आकाशातल्या चांदण्या. कधी नदीचे किनारे तर कधी सागराच्या लाटा. इंद्रधनुचे रंग, श्रावणसरी, धूसर धुकं… या सगळ्या गोष्टी आपल्या मनाला साथ देत राहतात. मग कधीतरी एखाद्या संध्याकाळी प्रेमाची चाहूल लागतेय असं वाटत असताना पुन्हा एक दुपार अशी येते की, सारं काही होत्याचं नव्हतं करून जाते. आपल्या मनासारखं प्रेमही चंचल असतं. तरी आपला शोध अविरत सुरू असतो. कधीतरी ही चाहूल प्रत्येक मनाला लागते आणि कधीतरी विरहवणवादेखील अनुभवावा लागतो. प्रेमाची अशी दोन्ही रूपं आपलं मन अनुभवतं, पण कधी कधी आजन्म शोध संपणार नाही असं वाटत राहतं. यामागे एकच कारण असू शकतं ते म्हणजे हळूहळू मनातल्या भावना काय आहेत त्या समजून घेऊन त्या जपण्याचा प्रयत्न न करता उगीच प्रेमाच्या नावे काहीतरी भव्यदिव्य गोष्टी करायला जाणं.
प्रेमात खरं तर भावनेला महत्त्व असावं. मनाची भाषा मनाला कळावी. ती डोळ्यांनीच समजून घ्यावी. कारण मुक्या भावना खूप काही बोलून जातात. ते बोल ऐकता आले म्हणजे झालं, पण हल्ली तसं होत नाही. कारण मुक्या भावनांनी अलगदपणे डोळ्यांतून व्यक्त केलं जाणारं प्रेम विरळ होत चाललंय. या प्रेमातून मन कधीच हद्दपार झालंय. म्हणून अशा प्रेमाचं आयुष्यसुद्धा क्षणिक होत चाललंय. अजून काही वर्षांनी खरं प्रेम काय असतं आणि कसं असतं याचा विसर पडून प्रेमाची सुरुवात व्हायची असते हेसुद्धा विसरतील लोक.
असंच काहीसं हल्ली मनाचं झालंय. हरवलेल्या प्रेमाचा शोध घेत बिचारं वेडय़ासारखं प्रेम शोधतंय आणि प्रेमाची वाट पाहत एखादं गाणं गातंय.
हे प्रेम अंतरीचे माझ्या मनात असते
या दाही दिशांमध्ये
मजला सखी ती दिसते
तरी तिच्या मनी प्रीतीची
चाहूल का नसावी?
हुरहुर या मनाची
तिला ऐकू तरी जावी…





























































