ग्रामपंचायतीच्या लेखापरीक्षणासाठी 60 हजारांची लाच मागितली, लाचखोर सहायक संचालकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायतचे लेखापरीक्षण करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून 60हजार रुपयांची लाच घेताना स्थानिक निधी लेखापरीक्षा कार्यालयातील सहायक संचालक संतोष कंदेवार यांना लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,तक्रारदार यांना नांदेड जिल्ह्यातील 66 ग्रामपंचायतीचे सन 2021-22 चे लेखापरीक्षण करून अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले होते. तक्रारदार यांच्याकडे ग्रामपंचायत लेखा परीक्षणाचे काम दिल्याचा मोबदला म्हणून ज्या ग्रामपंचायतीचे खर्च पाच लाख रुपये आहे त्यास एक हजार रुपये,ज्या ग्रामपंचायतीचे खर्च दहा लाख रुपयापर्यंत आहे त्यास दोन हजार रुपये,व ज्या ग्रामपंचायतच्या खर्च दहा लाखापेक्षा जास्त आहे अशांना दहा हजार रुपये प्रति ग्रामपंचायत असे एकूण 70 हजार रुपये द्यावे लागतील म्हणून तक्रारदार यांच्याकडे मागणी केली होती. यानंतर तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत विभागाशी संपर्क साधत याबाबत तक्रार केली होती.लाचलुचपत विभागाकडून तक्रारीची पडताळणी केली असता तडजोडीअंती सहाय्यक संचालक संतोष कंदेवार यांनी 60 हजार रुपयांची मागणी पंचासमक्ष केली. यावरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी संतोष कंदेवार सहायक संचालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत विभागाने दिली आहे. 13 जुलै रोजी या प्रकरणात खात्री झाली होती मात्र आरोपी चा शोध सुरू होता..काल रात्री त्यास अटक करण्यात आली असल्याचे लाच लुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे यांनी सामना शी बोलताना दिली.
नांदेड महापालिकेत देखील कंदेवार यापूर्वी कार्यरत होते. त्या नंतर त्यांची नागपूर ला बदली झाली होती. पुन्हा ते नांदेड ला बदलून आले होते.

ही कारवाई नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ.राजकुमार शिंदे, पोलीस उप अधीक्षक राजेंद्र पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन बोडके पोलीस नाईक राजेश राठोड, ईश्वर जाधव, सय्यद खदीर, गजानन राऊत, मारोती सोनटक्के प्रकाश मामुलवार आदींच्या पथकाने केली आहे.