
>> अमर मोहिते
जोगेश्वरी पश्चिम येथील आंबोलीतील श्री गणेश गृहनिर्माण सोसायटीजवळ दरड कोसळण्याचा धोका टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला 9 मीटर उंच व 35 मीटर लांब संरक्षक भिंत उभारायची आहे. मात्र येथे झोपडय़ा आहेत. त्या हटवण्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाला (एसआरए) पत्र लिहिले जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने उच्च न्यायालयात दिली आहे.. सुनील शुक्रे व न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने एसआरएचे वकील विजय पाटील यांना याबाबत माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. येथील चंदू खरवा व अन्य जणांना महापालिकेने जागा रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे. या नोटीसला त्यांनी न्यायालयात याचिका करून आव्हान दिले आहे. यात सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता नितीन पगारे यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. पालिकेने गेल्या वर्षी जागा रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे. त्याविरोधात त्यांनी ही याचिका केली आहे.
– संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यासाठी येत्या दोन महिन्यांत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून निविदा मागवल्या जाणार आहेत. येथे झोपडय़ा आहेत. संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यासाठी या झोपडय़ा हटवणे गरजेचे आहे. त्यासाठी एसआरएला पत्रही लिहिले जाणार आहे. ही संरक्षक भिंत बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यवाही सुरू केली आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र
उपनगर जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. गणेश गृहनिर्माण सोसायटीजवळ 35 मीटर लांब व 9 मीटर उंच संरक्षक भिंत बांधण्याची परवानगी दिली आहे. या भिंतीचे बांधकाम अजूनही सुरू झालेले नाही. त्यासाठी तेथील झोपडय़ा हटवणे आवश्यक आहे, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.
श्री गणेश सहकारी गृहनिर्माण संस्थेचे पत्र
या सोसायटीच्या बाजूला डोंगराळ भाग आहे. त्यामुळे तेथे 25 ते 30 फूट उंच संरक्षक भिंत बांधली आहे. 2020मध्ये मुसळधार पावसामुळे येथील 20 फूट भिंत ढासळली आहे. भविष्यातही ही भिंत ढासळण्याची शक्यता आहे. येथील झोपडय़ांना याचा धोका होऊ शकतो. या झोपडय़ा येथून हटवाव्यात, अशी विनंती सोसायटीने स्थानिक आमदाराकडे 2021मध्ये पत्र लिहून केली होती. त्यानंतर सोसायटीजवळ संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.

























































