
>> राज चिंचणकर
रंगमंचाच्या अवकाशात, ढासळत चाललेल्या वाडय़ाचे चिरेबंदीपण आणि मनाचा तळ गाठलेल्या मानवी नातेसंबंधांचे दर्शन देणारे नाटक
एकेकाळी श्रीमंतीच्या खुणा अंगावर वागवणारे वाडे आता पडझडीच्या वाटेवर चालत स्वतला मातीत गाडून घेण्याच्या पवित्र्यात आहेत. अशा चिरेबंदी वाडय़ांमध्ये वास्तव्य करणाऱया वाडेकऱयांनी मात्र या पडझडीत स्वतला कसेबसे सावरून धरले आहे, पण एकूणच वाडा संस्कृती लयास जाण्याच्या मार्गावर असताना या संस्कृतीच्या खुणा रंगमंचावर मात्र दृगोच्चर होताना दिसतात. ‘वाडा चिरेबंदी’ या नाटय़कृतीने या संस्कृतीला पुन्हा एकदा चेहरा बहाल केला आहे. हा वाडा आता नव्याने रंगभूमीवर अवतरला असून त्याद्वारे ढासळत चाललेल्या वाडय़ाचे चिरेबंदीपण आणि मनाचा तळ गाठलेल्या मानवी नातेसंबंधांचे दर्शन पुन्हा रंगमंचाच्या अवकाशात होत आहे.
नाटककार महेश एलकुंचवार यांच्या लेखणीतून उतरलेल्या या चिरेबंदी वाडय़ाचे अंतरंग आणि त्यातल्या वाडेकऱयांचा जीवनपट आजच्या काळाशीही समन्वय साधतो. सर्वसाधारण लोकांचे जीवनमान, सध्याच्या युगातही जुन्याच भावभावनांना कवटाळून बसल्याचे त्यातून सूचित होत जाते. ‘वाडा चिरेबंदी’ या नाटय़कृतीत रंगमंचावर उभा असलेला वाडा विदर्भातल्या धरणगावकर देशपांडे यांचा आहे. या वाडय़ाचे एकेकाळचे वैभव आता नाहीसे होत चालले आहे. एकेकाळी गावात बडे प्रस्थ असणाऱया देशपांडेंची शान आता तशी उरलेली नाही; पण तरीही पूर्वपुण्याईनुसार देशपांडेंची मान मात्र अजूनही ताठ आहे.
धरणगावकर देशपांडे यांच्या या वाडय़ात वास्तव्य करणाऱया कुटुंबाचा परीघ विस्तारलेला आहे. या कुटुंबात थोरला भास्कर, त्याची पत्नी, मुलगा व मुलगी आहे. त्याचबरोबर भास्करची आई, दादी, बहीण, धाकटा भाऊ अशी मंडळीही आहेत. या घराचा आधारस्तंभ असलेले तात्येजी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या दिवसकार्यासाठी मुंबईत राहणारा भास्करचा मधला भाऊ सुधीर याला बोलावणे धाडण्यात आल्यावर चार दिवसांनी सुधीर त्याची पत्नी अंजलीसह वाडय़ावर येऊन पोहोचला आहे. एकंदरीत वाडय़ातले वातावरण गांभीर्य पांघरून असले तरी अशा वेळी या भावंडांच्या तोंडून कौटुंबिक हक्कांचा विषय बाहेर निघतो. भास्करचा धाकटा भाऊ चंदू हा कुटुंबातले स्वतचे अस्तित्व हरवल्यागत निव्वळ हरकाम्याची जबाबदारी पार पाडत आहे. त्यामुळे भास्कर आणि सुधीर यांच्यातच याबाबत संवाद झडत आहेत.
भास्करची बहीण प्रभा हिचे शिक्षण अर्ध्यावर सुटले आहे आणि तिचे लग्नही राहून गेले आहे. भास्करची मुलगी रंजू ही फिल्मी स्वप्नरंजनात मश्गूल असल्याने तिचे चित्त भलत्याच ठिकाणी लागले आहे. भास्करचा मुलगा पराग हा एकलकोंडेपणाचा शिकार होऊन बसला आहे. जगरहाटी आणि परंपरेला अनुसरून वडिलांचे कार्य व्हावे अशी भास्करची इच्छा असली तरी त्यासाठी अंगावर पडणारा आर्थिक भाराचा प्रश्नही उपस्थित झाला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर या वाडेकऱयांच्या नातेसंबंधांच्या पायाला घट्ट कवटाळत हा वाडाच एक पात्र बनून रंगमंचावर दृश्यमान होतो.
वाडय़ाला मध्यवर्ती स्थान बहाल करत त्या भोवती फिरणारी पात्रे आणि साध्यासोप्या भाषेत केलेली संवादी मांडणी हे या संहितेचे वैशिष्टय़ आहे. काळ बदलला तरी मानवी मने अजून तशीच; किंबहुना या मनांवरची जळमटे दूर करण्याचा साधा प्रयत्नही कुणी करत नसल्याची शोकात्म भावना यातून दृग्गोचर होते. वैदर्भीय पार्श्वभूमीवर घडणारी ही नाटय़कृती आणि त्यातल्या पात्रांचे वैदर्भीयपण दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी ठाशीवपणे मंचित केले आहे. संहितेची गरज अचूक ओळखून त्यांनी हा अख्खा वाडा मनात रुंजी घालत राहील याचे व्यवधान राखले आहे. प्रत्येक प्रसंगातल्या उत्कटतेला त्यांनी आगळे परिमाण प्राप्त करून दिले आहे. पात्रांचे स्वभाव ठसवत आणि त्यांच्यातले बारकावे बाहेर काढत त्यांनी हा प्रयोग मनाला भिडेल अशा पद्धतीने आविष्कृत केला आहे.
आतापर्यंत साकारलेल्या विनोदी भूमिकांच्या शैलीला विरोधाभास ठरेल अशी व्यक्तिरेखा वैभव मांगले यांना या नाटकात भास्कर या पात्राच्या निमित्ताने रंगवण्यास मिळाली आहे. ही भूमिका त्यांनी कमाल साकारली आहे. निवेदिता सराफ यांनी यात वहिनीची भूमिका ठोसपणे रंगवत वैदर्भीय भाषेचा लहेजा सांभाळला आहे. आशीष कुलकर्णी याने यात सुधीरचे पात्र साकारताना त्याच्या मनातल्या घुसमटीचे उत्तम दर्शन घडवले आहे. रंजूच्या भूमिकेत सिमरन सैद हिने लक्षवेधी आणि आश्वासक कामगिरी केली आहे. प्रतिमा जोशी यांनी धीरगंभीर अशा प्रभाची प्रतिमा नीट उभी केली आहे. धनंजय सरदेशपांडे (चंदू), पौर्णिमा मनोहर (अंजली), आसावरी घोटीकर (आई), अजिंक्य ननावरे (पराग), विनिता शिंदे (दादी) यांच्या भूमिकाही लक्षात राहण्याजोग्या आहेत.
नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी उभारलेला हा वाडा एखाद्या पुराणपुरुषाचा भास निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. रवी-रसिक यांच्या प्रकाश योजनेतून संपूर्ण वाडा जुनाट पिवळ्या रंगात न्हाऊन निघाल्याचे रंगमंचावर दिसते आणि त्यातून हा वाडा अधिकच बोलत राहतो. आनंद मोडक यांच्या पार्श्वसंगीतात गहिरी डूब आहे. प्रतिमा जोशी व भाग्यश्री जाधव यांनी केलेली पात्रांची वेशभूषा तसेच उलेश खंदारे यांची रंगभूषा वाखाणण्याजोगी आहे. ‘जिगिषा’ व ‘अष्टविनायक’ या नाटय़ संस्थांनी हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणून या वाडय़ाला नव्याने अस्तित्व प्राप्त करून दिले आहे. एकूणच, थेट मनाच्या तळाशी पोहोचत हा वाडा त्याची छाप उमटवतो आणि त्याच्या अंतरंगात पुन पुन्हा डोकावण्यास भाग पाडतो.





























































