
मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत कल्याण स्थानकानजीक झालेल्या बिघाडामुळे जलद मार्गावरील लोकल गाडय़ांचा तब्बल अर्धा तास खोळंबा झाला. त्यामुळे ऐन गर्दीच्यावेळी सकाळी चार गाडय़ा रद्द करण्याची नामुष्की मध्य रेल्वेवर ओढावली. परिणामी सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. अनेकांना कार्यालयात पोहोचण्यासाठी लेटमार्क लागला. तसेच ठाणे, घाटकोपर, कुर्ला दादर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्याने प्रवासी रेल्वेच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहत होते.
कल्याण स्थानकात जलद मार्गावरील सिग्नल यंत्रणेत सकाळी 6.30 वाजता बिघाड झाल्याने येथून फलाट क्रमांक सहा आणि सातवरून धावणाऱया जलद लोकल गाडय़ांची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे चार गाडय़ा रद्द कराव्या लागल्या. सदर तांत्रिक बिघाड अर्ध्या तासात दुरुस्त झाला खरा, पण लोकल वाहतूक पुरती विस्कळीत झाली होती. पण गाडय़ाच पुढे जात नसल्याने सकाळी ऑफिसला जाणाऱया प्रवाशांना लेटमार्क लागला. दरम्यान, लोकल वाहतूक पूर्ववत झाल्यानंतरही गाडय़ा विलंबाने धावत असल्याने जलद मार्गावरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
पश्चिम रेल्वेवरही बिघाड
पश्चिम रेल्वेच्या धिम्या मार्गावर दुपारी तीनच्या सुमारास सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने लोकल गाडय़ा पंधरा-वीस मिनिटे विलंबाने धावत होत्या. त्यामुळे अंधेरी, वांद्रे, दादर स्थानकात प्रवाशांची गर्दी होती. तसेच अंधेरी येथे गाडय़ांचे बंचिंग झाले होते.




























































