
वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशात दुर्भम भागातील डॉक्टरांना सर्वप्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यांच्या कोटय़ामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही, अशी हमी सीईटी सेलकडून अॅड. यशोदीप देशमुख यांनी उच्च न्यायालयात दिली.
याप्रकरणी डॉ. उज्ज्वला अदाते व अन्य यांनी अॅड. व्ही. एम. थोरात यांच्यामार्फत याचिका केली होती. न्या. नितीन जामदार व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. याचिकाकर्ते विविध सरकारी रुग्णालयात कार्यरत आहेत. राज्य शासनाने 19 जुलै 2019 रोजी अधिसूचना काढली आहे. दुर्गम व ग्रामीण भागात तीन वर्षे सेवा देणाऱया वैद्यकीय अधिकाऱयांना पदव्युत्तर प्रवेशात प्राधान्य द्यावे त्यानंतर अन्य वैद्यकीय अधिकाऱयांना प्रवेशात आरक्षण द्यावे, अशी तरतूद या अधिसूचनेनुसार करण्यात आली आहे, असे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.
या वर्षी पदव्युत्तर प्रवेशाच्या पहिल्या फेरीत दुर्गम व ग्रामीण भागात काम करणाऱया वैद्यकीय अधिकाऱयांना प्राधान्य देण्यात आले. त्यानंतरही प्रवेशाच्या काही जागा रिक्त आहेत. त्या जागांसाठी आम्ही पात्र आहोत. तरीदेखील आम्हाला प्रवेश दिला जात नाही. आम्हाला या कोटय़ातून प्रवेश दिला जावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली.
दुर्गम व ग्रामीण भागात काम करणाऱया वैद्यकीय अधिकाऱयांना प्रवेशाच्या प्रथम फेरीत प्राधान्य दिले आहे. पुढील प्रवेश फेरीत याचिकाकर्त्यांना अधिसूचनेतील तरतुदीनुसार प्राधान्य दिले जाईल. मात्र दुर्गम व ग्रामीण भागात काम करणाऱया वैद्यकीय अधिकाऱयांचा कोटय़ात काहीही बदल केला जाणार नाही, अशी हमी सीईटीकडून अॅड. देशमुख यांनी न्यायालयात दिली. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने ही याचिका निकाली काढली.



























































