हिंगोलीत आंदोलनाला हिंसक वळण, जमावाने सरकारी गोदाम जाळले; लाखोंचं नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालन्यात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध करत राज्यभर आंदोलनं सुरू आहेत. हिंगोली जिल्ह्यातही याचे पडसाद उमटले असून त्याला हिंसक वळण लागले आहे. शनिवारी सेनगाव येथे धान्याच्या शासकीय गोदामास आग लावण्यात आली. तसेच शासकीय वाहनही जाळण्यात आले. या घटनेत एकूण 3 लाख 88 हजार 600 रुपयाचे नुकसान झाले.

रविवारी हिंगोलीतील सेनगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला होता. तसेच शहरात जागोजागी रास्ता रोको करण्यात आले आहे. दरम्यान सेनगाव येथे काही अज्ञातांनी रास्त भाव दुकानाच्या शासकीय गोदामास आग लावली. यामध्ये बारदाना 21 हजार पोते, तांदळाने भरलेले 102 कट्टे जळून खाक झाले. यामध्ये एकूण 2 लाख 88 हजार 600 रुपयांचे नुकसान झाले. तसेच या जमावाने तहसील कार्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या सरकारी वाहनाला देखील आग लावली. याप्रकरणी दिलीप भीमराव कदम यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.