नेवाशात बंद शांततेत; निषेध मोर्चा, रास्ता रोको

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ नेवासा तालुक्यात बंद पाळण्यात आला. नेवासा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढून गणपती चौक येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे यांना निवेदन देण्यात आले. स्नेहल दरंदले, पूनम दरंदले, ऋतुजा रौंदळ, राणी दरंदले, ऋतुजा कोकणे, श्रावणी कर्डिले या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करताना सरकारचे वाभाडे काढले. दरम्यान, राम गायकवाड यांनी आरक्षणासाठी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, तत्पूर्वीच पोलिसांनी गायकवाड यांना ताब्यात घेतले.

सोनई, घोडेगावात बंद शांततेत

सोनई ः जालन्यातील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज सोनई व घोडेगावमध्ये पुकारण्यात आलेला बंद शांततेत पार पडला. या बंदमध्ये व्यापाऱयांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. अत्यावश्यक सेवा वगळता, बंद शांततेत पार पाडला. घोडेगाव बंद असल्याने घोडेगाव मार्केटचा बुधवारचा कांदा लिलाव गुरुवारी होणार असल्याचे कांदा आडतदार संतोष वाघ यांनी सांगितले. सोनईचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.