
डोक्यावर बाप्पाची मूर्ती आणि हातात सजावटीचे साहित्य घेतलेल्या हजारो चाकरमान्यांनी आज ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करत कोकणची वाट धरली. रेल्वेसह एसटीकडून गणपती विशेष गाडय़ा सोडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या कुटुंबकबिल्यासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनससह एसटीच्या मुंबई सेंट्रल आगार, परळ येथे गाडय़ा पकडण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.
गणेशोत्सवानिमित्त रेल्वेकडून कोकण रेल्वे मार्गावर नियमित गाडय़ांबरोबरच विशेष मेल-एक्प्रेस गाडय़ा चालवल्या जात आहे. सदर गाडय़ा पकडण्यासाठी रात्रीपासूनच चाकरमान्यांनी स्थानकात मोठी गर्दी केली. चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सीएसएमटी, दादर स्थानकात रेल्वेकडूनही कोणती विशेष गाडी कुठे लागणार याची माहिती मोठय़ा एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून दिली जात होती.
मुंबईतून 423 गाडय़ा रवाना
गणेशोत्सवानिमित्त एसटीने चाकरमान्यांसाठी जवळपास चार हजार जादा गाडय़ा सोडल्या आहेत. त्यापैकी आज 423 गाडय़ा रवाना झाल्या. त्यापैकी 175 गाडय़ा मुंबई सेंट्रल येथून तर 284 गाडय़ा परळ, सेनापती बापट मार्ग, दादर येथून सोडण्यात आल्या. त्यामुळे परिसरात चाकरमान्यांची मोठी गर्दी झाली होती. तसेच खासगी लक्झरी बससाठीही प्रवाशांची ठिकठिकाणी गर्दी होती.


























































