
>> दिलीप ठाकूर
माणसाच्या आयुष्याचा शेवट कसा असेल अथवा होईल हे सांगता येत नाही. अभिनेता अखिल मिश्राचे असेच झाले. जवळपास चार दशके चित्रपटांतून छोट्या छोट्या भूमिका साकारत साकारत वाटचाल करीत असलेल्या अखिल मिश्राला आता कुठे ओळख मिळत होती. त्याला अधिक लांबीच्या भूमिका मिळतील असे कुठे वाटू लागले होते तोच स्वयंपाकघरात टेबलावर उभा राहून काही काम करत असतानाच तो तोल जाऊन पडला आणि त्यात त्याचा जीव गेला.
मुंबईतील मनोरंजन क्षेत्रात कलाकार बनण्याचे स्वप्न घेऊन देशभरातील अनेक भागांतून अनेक जण येतात. विशेषतः नव्वदच्या दशकात मनोरंजन उपग्रह वाहिन्या आणि मालिकांचे जग विस्तारल्यावर तर संधींची शक्यता वाढली. नायक म्हणून कदाचित संधी मिळणार नाही, पण सहभूमिका, चरित्र भूमिका यातून वाटचाल करता येऊ शकते असे सकारात्मक वातावरण वाढले होते आणि मध्य व उत्तर भारतातील शुद्ध हिंदी भाषिक कलाकारांच्या आशा अधिक उंचावल्या. मुंबईत आल्यावर शक्यतो वायव्य मुंबईत (अंधेरी ते गोरेगाव, मालाड) अथवा मीरा रोड, भाईंदर परिसरात भाडय़ाच्या घरात राहून निर्मात्यांच्या भेटीगाठी घेत घेत ‘मिलते रहो’ अशी आश्वासने हसत हसत स्वीकारत आशा कायम ठेवणारे अनेक कलाकार होते. अखिल मिश्राही त्यातलाच एक गुणी कलाकार. त्याचा जन्म 22 जुलै 1956 चा उत्तर प्रदेशातील कानपूर येथील. शुद्ध हिंदी भाषिक आणि मेहनतीची तयारी. अशा वेळी हवी असते संधी आणि मिळेल त्या संधीचा सदुपयोग. आपली भूमिका कापली जाणार, श्रेयनामावलीत आपले नाव दहा जणांत येणार, चित्रीकरण आल्यावर वेळेस आपल्याला साधारण सुविधा उपलब्ध असणार या सगळय़ाची कल्पना गृहीत धरूनच करीअर करायची असते. अखिल मिश्राने अतिशय आनंदाने आपली कारकीर्द घडवली. ‘धत्त तेरी की’ (1983) या चित्रपटात अगदी मोजक्याच दृश्यांत तो होता. तेही चालेल असे वाटत असते. त्यानंतर अनेक चित्रपटांच्या श्रेयनामावलीत त्याचे नाव शोधावे लागले, पण राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘थ्री इडियट्स’मधील लायबेरियन दुबे या त्याच्या व्यक्तिरेखेने लक्ष वेधून घेतले आणि मग आजच्या डिजिटल पिढीने गुगल सर्च करीत त्याची माहिती व महती जाणून घेण्यात रस घेतला. लक्षवेधक काम करण्याचा हा परिणाम असतो. प्रत्येक वेळेस अशी भूमिका व असे फुटेज मिळण्याची शक्यता नसते, पण थांबायचेही नसते. या दशकात बदललेल्या हिंदी चित्रपटात अनेक प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारायची संधी मिळतेय. इतकेच नव्हे तर देखणा चेहराच असायला हवा असा नियम नाही. व्यक्तिरेखेचा चेहरा मात्र अभिनयात असावा. अखिल मिश्राने तो जॉन मॅथ्यूज मथास दिग्दर्शित ‘शिखर’मधील जाधव, ‘कर्म’मधील विनायक माथूर, ‘वेल डन डब्बा’मध्ये तहसीलदार अरुण मिश्रा तसेच ‘उतरन’ या मालिकेतील उमेदसिंग बुंदेला अशा व्यक्तिरेखांत दाखवला. ‘कमला की मौत’, ‘हमारी शादी’, ‘करीब’, ‘मेरे दोस्त पिक्चर अभी बाकी है’, ‘गांधी माय फादर’, ‘डॉन’, ‘हजारों ख्वाईशे ऐसी’ अशा चित्रपटांतून तसेच ‘रजनी’, ‘भारत की खोज’, ‘श्रीमान श्रीमती’ (यात जाहिरातपटाचा दिग्दर्शक), ‘सीआयडी’ (यात उद्योगपती), ‘उडान’, ‘प्रधानमंत्री’, ‘दो दिल बंधे एक डोली से’, ‘गृहलक्ष्मी का जिन’ अशा अनेक मालिकांतून भूमिका साकारत वाटचाल केली. ‘मंजू की ज्युलिएट’ या लघुपटाचे लेखन, निर्मिती व दिग्दर्शन करीत तोही अनुभव घेतला. पहिली पत्नी मंजू मिश्रा हिच्या निधनानंतर अखिल मिश्राने सुझान बर्नेटसोबत लग्न केले. तीदेखील अभिनय क्षेत्रात आहे. अखिल मिश्राच्या निधनाचे वृत्त तिच्यासाठी धक्कादायक ठरणे अगदी स्वाभाविक आहेच. अखिल मिश्रा आणखी मोठी झेप घेऊ शकला असतानाच वयाच्या 67 व्या वर्षी तो काळाच्या पडद्याआड गेला.
glam.thakurdilip.gmail.com






























































