
>> मृणाल घनकुटे
त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण बरेच घरगुती उपाय करत असतो. यापैकी एक म्हणजे डीआययू (डू इट युवरसेल्फ) फेस पॅक मास्क. अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने नुकतेच एका मुलाखतीत डीआययू फेस मास्कची माहिती दिली. दीपिका म्हणाली, ‘मी बेसन, हळद आणि मलाई फेस मास्क वापरते.’ खरं तर डीआययू स्किन केअर उपाय आपल्याकडे शतकानुशतके वापरला जात आहे. त्याचे फायदे आज जाणून घेऊया.
डीआययू फेक मास्कविषयी डर्माटॉलॉजिस्ट गीतिका मित्तल गुप्ता म्हणाल्या, ‘स्किन केअरचा विचार केल्यास नैसर्गिक घटक तजेलदार स्किनटोनची गुरूकिल्ली ठरतात.
बेसन – बेसन एक्सफोलिएशनमध्ये मदत करते. त्याचे बारीक कण त्वचेच्या मृत पेशी हळुवारपणे धुऊन टाकतात. त्वचेवरील छिद्रे बंद करतात.
हळद पावडर – हळद मुरुमांचा सामना करण्यास, डाग कमी करण्यास मदत करते.
क्रीम (मलाई) – क्रीम त्वचेला आवश्यक असलेले हायड्रेशन आणि पोषण देते. ते ओलावा कमी करते, ज्यामुळे त्वचा मऊ वाटते.
या डीआययू फेस मास्कचा प्रभाव प्रत्येकाच्या त्वचेच्या प्रकारावर आणि संवेदनशीलतेवर अवलंबून असतो. त्यामुळे हा उपाय वापरण्यापूर्वी काय करावे व काय टाळावे यांचे मार्गदर्शन द एस्थेटिक क्लिनिकच्या कॉस्मेटिक त्वचा शास्त्रज्ञ आणि त्वचा शल्यचिकित्सक डॉ. रिंकी कपूर यांनी केले.
पॅच टेस्ट – चेहऱयावर मास्क लावण्यापूर्वी तुमच्या त्वचेच्या छोटय़ा भागावर पॅच टेस्ट करा आणि ऍलर्जीची तपासणी करा.
स्वच्छ चेहरा – मास्क लावण्यापूर्वी हलक्या क्लिंझरने चेहरा धुवा.
चांगले मिश्रण – सर्व घटक मिसळू गुळगुळीत पेस्ट तयार करा.
हळुवारपणे लावा – मास्क चेहऱयाला हळुवारपणे वरच्या दिशेने लावा.
वेळ – सुमारे 15 ते 20 मिनिटे किंवा ते कोरडे होईपर्यंत मास्क चेहऱयाला लावून ठेवा.
स्वच्छ धुवा – मास्क स्वच्छ धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. एक्सफोलिएट होण्यासाठी गोलाकार हालचालींमध्ये हळुवारपणे मालिश करा.
मॉइश्चरायझेशन – चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावा.
या गोष्टी टाळाव्यात
हळदीचे डाग – हळद जास्त प्रमाणात लावल्यामुळे किंवा चेहऱयाला जास्त वेळ लावून ठेवल्यामुळे त्वचेवर पिवळा रंग येऊ शकतो. मास्क लावताना नियमित प्रमाण आणि वेळेची खात्री करा.
ऍलर्जी – तुम्हाला ऍलर्जी असल्यास हे वापरू नका.
अतिवापर – हा मास्क वारंवार वापरू नका. साधारणपणे आठवडय़ातून एक किंवा दोनदा पुरेसा असतो. अतिवापरामुळे कोरडेपणा किंवा त्वचेची आग होऊ शकते.
सूर्यप्रकाश टाळा – मास्क वापरल्यानंतर काही तास थेट सूर्यप्रकाश टाळावे. हळद त्वचेला सूर्यप्रकाशास अधिक संवेदनशील बनवू शकते. तुमची त्वचा संवेदनशील असल्यास किंवा त्वचेची कोणतीही
समस्या असल्यास कोणताही घरगुती उपाय वापरण्यापूर्वी त्वचारोगतज्ञांशी सल्लामसलत करणे चांगले. काहीही प्रतिकूल परिणाम दिसत असल्यास घरगुती उपाय बंद करा, असे डॉ. रिंकी कपूर यांनी सांगितले.



























































