संतापजनक! गुजरातमधील शाळेत हिंदू विद्यार्थ्यांना नमाज पठण करायला लावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातच्या अहमदाबादमध्ये संतापजनक घटना घडली आहे. येथील एका खासगी शाळेत जागरुकता कार्यक्रमाच्या नावाखाली हिंदू विद्यार्थ्यांना नमाज पठण करायला भाग पाडले. या घटनेबाबत हिंदू संघटना संतप्त झाल्या असून त्यांनी निषेध व्यक्त करत शाळेतील शिक्षकाला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुजरात सरकारने या घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

ही घटना अहमदाबादच्या घाटलोडीया परिसरातील केलोरेक्स फ्युचर शाळेतील आहे. ही घटना 29 सप्टेंबरची असल्याची बोलले जात आहे. याप्रकरणी शाळेने माफी मागितली आहे. शाळा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणात या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना सर्व धर्मांबाबत जागरुकता करणे होता. कोणत्याही विद्यार्थ्यांला नमाज पठण करायला भाग पाडले नव्हते.

या घटनेबाबत शाळेच्या फेसबुक पेजवर एक व्हिडीओ जारी करण्यात आला होता. नंतर तो व्हिडीओ हटविण्यात आला. ज्यामध्ये प्रायमरीचा विद्यार्थी नमाज पढताना दिसत आहे. या घटनेनंतर हिंदू संघटनांनी शाळा परिसरात धरणे आंदोलन केले. दरम्यान त्यांनी एका शिक्षकाला बेदम मारले, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, सणांआधी विद्यार्थ्यांना विविध धर्मांची ओळख करुन देणे शाळेची परंपरा आहे. यामुळे या सणाची माहिती देण्यासाठी आम्ही ईद संदर्भात कार्यक्रमही आयोजित केला होता. आम्ही कोणत्याही विद्यार्थ्यावर नमाज पठणाची बळजबरी केली नाही. ही एक अॅक्टीव्हीटी होती ज्यासाठी मुलांच्या पालकांनी परवानगी दिली होती असे स्पष्टीकरण देण्यात आले.