CWC 2023 – नवयौवनात बुमरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

जसप्रीत बुमरा हिंदुस्थानी संघात परतणं हा वर्ल्ड कपसाठी शुभशकुन आहे. त्यामुळे गोलंदाजीचा भाता आता परिपूर्ण वाटतो.

दिल्लीला रोहितच्या बॅटच्या झगमगाटात बुमराची गोलंदाजी थोडी विसरली गेली, पण तिचं महत्त्व त्या फलंदाजीच्या आतषबाजीएवढचं होतं. रोहितने गोलंदाजांच्या डोळय़ापुढे काजवे चमकवले. बुमराने फलंदाजाना काजवे दाखवले. जी खेळपट्टी धावा चिकूच्या भावात देते त्या खेळपट्टीवर विकेट avacado च्या भावात मिळतात. बुमराने तिथे 4 विकेट घेतल्या. नाहीतर अफगाणिस्तान संघसुद्धा 325 धावांच्या पुढे गेला असता. गोलंदाज तिथे मोठा ठरतो.

बुमरा दुखापतीतून नुसता बाहेर नाही आला, तर नवं यौवन घेऊन आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणं सोपं नसतं. फलंदाजाला नसतं, गोलंदाजाला नसतंच नसतं. त्याची गोलंदाजीची ऍक्शन हे त्याला देवाने दिलेल वरदान आहे. त्यामुळे फलंदाजाला चेंडूचा अंदाज नीट येणं कठीण जातं. पण ती ऍक्शन शापही ठरतो. त्याच्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. काही वेळा गंभीर दुखापत होऊ शकते. त्याच्या बाबतीत मला नेहमी ती भीती वाटायची. सुदैवाने तो असा परतला की, मध्ये काही घडलंच नाही. ना वेग कमी, ना बाऊन्सर, ना पाय चेचणारे यॉर्कर आणि खेळपट्टीचा बाऊन्स तो असा ओळखतो की, जणू आदल्या रात्री खेळपट्टी स्वप्नात येऊन बाऊन्सच गुपित त्याला सांगते. त्याला फलंदाज किंवा खेळपट्टीप्रमाणे टप्पा आणि दिशा बदलत जायला वेळ लागत नाही.
त्याने स्वतः कबूल केलं की, विकेट काढण्याच्या मागे तो जात नाही. तो फलंदाजाला रोखतो. धावासाठी तो फलंदाजाला कासावीस करतो आणि मग फलंदाज त्याला विकेट देतो. वन डेमध्ये फार प्रयोग करत बसत नाही.

पण तरीही सर्वसाधारणपणे पहिल्या स्पेलमध्ये उद्घाटन करून देतो. मध्ये मोठी भागीदारी झाली तर ती तोडण्यासाठी कर्णधार त्याच्याकडे चेंडू फेकतो.

फार कमी वेळा त्याने कर्णधाराला नाराज केले आहे. आणि शेवटच्या डेथ ओव्हर्समध्ये त्याला तोड नाही. तो धावा रोखतो, तुम्ही मारायला गेलात तर खूप मोठी जोखीम घ्यावी लागते.
फक्त विकेट घेणं हे त्याच ध्येय नसून त्याची आकडेवारी वाईट नाही. वन डेमध्ये 162 गोलंदाजांनी 100 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. त्यात बुमरा 16 वा आहे. सामन्यामागे दोनपेक्षा किंचित कमी त्याचा विकेट घेण्याचा रेट आहे. बुमरा एका बाजूने धावा रोखून फलंदाजांवर दबाव टाकत असल्यामुळे कुलदीप, शमी जोखीम घेऊन विकेट घेऊ शकतात.

थोडक्यात, जी जागा विराटची फलंदाज म्हणून संघात आहे, ती बुमराची गोलंदाजीत आहे.