आरक्षण दिले नाही तर मराठा आंदोलन सरकारला झेपणार नाही; मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा समाजाचा वापर करून महाराष्ट्रात सत्ता आल्या. राजकीय नेते मोठे झालेत. आता आम्हाला आरक्षण देण्याची वेळ आली तेव्हा पुरावे शोधले जातायत. त्यासाठी सरकारने 40 दिवसांचा अवधी मागितला होता तो आम्ही दिलाय. एवढे करूनही आरक्षण दिले नाही तर मराठा समाजाचे यापुढील आंदोलन सरकारला झेपणार नाही, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी आज मुंबईत बोलताना दिला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी मुंबईतील मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच विविध माध्यमांशीही संवाद साधला. या वेळी त्यांनी राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाबाबतची भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षणाचा हक्क मिळवून द्यावा, अशी आमची सरकारकडे मागणी असल्याचे जरांगे-पाटील म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रामाणिकपणे आपला लढा सुरू असून शेकटपर्यंत मी मागे हटणार नाही. माझी अंत्ययांत्रा निघेल किंवा मराठा समाजाची विजयी यात्रा निघेल. सामान्य मराठा आणि सामान्य ओबीसी समाज एकत्र आहे. मात्र मराठा आंदोलनाच्या आडून समाजा-समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, असे मनोज जरांगे-पाटील म्हणाले.

सरकार जर आम्हाला ओबीसीमधून आरक्षण देणार नसेल तर त्यांनी आमच्याकडून 40 दिवसांचा वेळ कशासाठी घेतला आहे? समिती कशासाठी गठीत केली आहे? आम्ही पूर्वीपासून ओबीसीमध्ये आहोत.

…तर मी दोन पावले मागे जाईन
स्वतःच्या हक्कासाठी सर्वसामान्य मराठय़ांनी उभं केलेलं हे आंदोलन आहे. स्वतःची भाकर खाऊन, दोन रुपये घेऊन ते आंदोलनाला येत असतात. स्वतःच्या कुटुंबाला सोबत घेऊन मोठी ताकद उभी केली जात आहे. या आंदोलनामागे सरकारचा किंवा राजकीय नेत्याचा हात असल्याचे सिद्ध करून दाखवा, तर मी दोन पावले मागे जाईन, असे जरांगे-पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले.