
>> महेंद्र पाटील
या मोसमातला पाऊस सुखरूप आपल्या घरी परतला होता. आठवणींची हिरवळ मागे सोडून भाद्रपदातील तळपत्या उन्हात पावसाळ्यातल्या काही गारठलेल्या आठवणी ऊब शोधू पाहत होत्या. अशातच तुझ्यावर मी लिहिलेल्या काही ओळींनी तुझ्या मनातली उत्तरं अबोल झाली होती… आणि तुझ्या मनाला काही बोलके प्रश्न पडले होते. खरंच मी इतकी चांगली आहे का? खरंच हे माझ्यावर लिहिलं असेल का ?
कधी कधी लिहिता लिहिता शब्द मनावर स्वार होऊन सैरावैरा धावू लागतात. तसं काहीसं माझं झालंय. म्हणून तुझ्या मनाला प्रश्न पडणं स्वाभाविक आहे, पण एक सांगू, परवा लिहिलेला प्रत्येक शब्द न् शब्द हा फक्त तुझ्यावर आणि तुझ्याचसाठी लिहिला आहे. तुला मी दिलेल्या उपमा व शब्दातून मांडलेलं तुझ्या सौंदर्याचं वर्णन…
खरं तर त्याच्याही पलीकडे तुझं सौंदर्य आहे… हे लिहिताना, तुझं वर्णन करताना शब्द अपुरे पडले की काय, असं मला पहिल्यांदा जाणवत होतं. तुला पाहिल्यावर, तुझा विचार मनात आल्यावर खूप काही मनात सांगण्यासारखं असायचं, पण नियतीच्या चौकटीत माझे शब्द अडकून राहायचे. खूपदा मनात जे सांगायचे होतं, जे बोलायचं होतं ते मनातल्या मनातच राहून जायचं…
त्या दिवशी विचार केला, एकदा लिहूनच टाकू तुझ्यावर म्हणजे निदान मनातल्या गुदमरलेल्या भावनांचे बंध सैल होतील. तुझ्यावर इतकं लिहूनही अजून बरंच काही उरलंय मनात. नेमकं काय उरलंय म्हणून तुझ्या मनाला सोबत घेऊन दूर दूर जावं, क्षितिजाच्याही पल्याड जाऊन मनातल्या मनात हरवलेल्या स्वप्नांचं एक हरवलेलं गाव शोधावं आणि चालत जावं त्या हिरव्यागार पाऊलवाटा मागे सारत. क्षितिजालाही हेवा वाटावा अशा एखाद्या ठिकाणी तुझ्या मनातल्या काही, माझ्या मनातल्या काही अनामिक प्रश्नांची काही अनामिक उत्तरं शोधत बसावं. रात्रीच्या गर्द अंधारात उगवतीची स्वप्नं पाहावी. पैलतीरावर एक अनामिक हुरहुर उरावी. प्रत्येक गोष्टीत एखादी हुरहुर अगदी हक्काने असावी. कारण जिथे हुरहुर उरत नाही तिथे गोष्ट संपते…
… आणि आपली गोष्ट कधी संपूच नये, ती अशीच सुरू राहावी आजन्म आणि पुन्हा कधीतरी कुठल्यातरी वळणावर तू जुन्या आठवांचे नवे गीत गावे… अशाच एका कातरवेळी तू समोर आल्यावर उरल्यासुरल्या भावनांचे बंध सैल व्हावेत.



























































