निसर्गमैत्र- पवित्र रुद्राक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अभय मिरजकर

आध्यात्मिक क्षेत्रात रुद्राक्षाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक उपनिषदांमध्ये, ग्रंथांमधून रुद्राक्षाची महती वर्णन केलेली आहे. एवढेच नव्हे तर प्राणतत्त्व नियमित करण्याची क्षमता यामध्ये असल्याचे सांगितले जाते. रुद्राक्षाचे अनेक प्रकार सांगितले जातात. रुद्राक्षाचे लाकूड हलके, मजबूत व चिवट असते. याची पाने चिंचेच्या किंवा गुंजेच्या पानासारखी, पण टोकदार, थोडी लांब असतात. या वृक्षाला पानांच्या बगलेत लोंब्या येऊन पांढरीशुभ्र, मंद वासाची फुले येतात. एप्रिल ते जुलै या काळात या वृक्षाला बोराच्या आकाराची गोल, जांभळट रंगाची फळे येतात. हिमालयाच्या पायथ्याशी डोंगराळ प्रदेशाच्या जंगलात रुद्राक्ष आढळतो.

समुद्रसपाटीपासून तीन हजार मीटर उंचीवर ही झाडे चांगली वाढतात. रुद्राक्षाचे झाड 8 ते 12 मीटर उंच असते. त्याची साल गडद करडी असते. शिवपुराण, स्कंदपुराण, देवी भागवत, शिवलीलामृत, पूरश्चरण- चंद्रिका, उमाम्हेश्र्वर तंत्र, श्रीगुरुचारीत्र इत्यादी ग्रंथांतून रुद्राक्षाचे सखोल वर्णन आढळते. याशिवाय ‘रुद्राक्ष जाबालोपनिषद’ नावाचे उपनिषद केवळ रुद्राक्षाच्या महतीवर प्रकाशझोत टाकते. रुद्राक्षाच्या वृक्षालाच रुधिरवृक्ष असे म्हणतात. त्याचे वनस्पतीशास्त्रीय नाव ‘एलिओकार्पस स्फेरिकस’ असे आहे. रुद्राक्षाच्या फळातील गर आंबट चवीचा पांढुरका व चिकट असतो. मेंदूचे विकार व अपस्माराचे झटके या विकारावर ते औषध म्हणून उपयोगी आहे. ही फळे झाडावर पिकून थंडीत खाली पडतात. फळाच्या आतील बियांनाच रुद्राक्ष म्हणतात. ती कठीण आवरणाची व नक्षीदार असते. खऱया रुद्राक्षाला आरपार भोक असते. त्याला वाहिनी म्हणतात. रुद्राक्षाचा रंग तांबूस असतो आणि तो पक्का असतो. हा पाण्यात टाकल्यास सरळ खाली जातो. त्याच्यामध्ये चुंबकीय गुणधर्म असतात. टांगलेल्या स्थितीत ते दक्षिणोत्तर दिशा दाखवतात. त्यांना कीड लागत नाही. रुद्राक्ष हातात धरला तर स्पंदने जाणवतात. उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी व मानसिक आरोग्यासाठी रुद्राक्ष अंगावर माळेच्या रूपात परिधान केला जातो. अध्यात्मात रुद्राक्षाला विशेष महत्त्व आहे.

रुद्राक्ष आम्ल, उष्णवीर्य व आयुकफनाषक आहे. त्याचा रक्तदाबाच्या (ब्लड प्रेशरच्या) रोग्याला उपयोग होतो. रात्री तांब्याच्या भांडय़ात रुद्राक्ष ठेवून भांडे भरून पाणी घालायचे आणि सकाळी रुद्राक्ष काढून ते पाणी प्यायले असता ब्लड प्रेशरवर उपयोग होतो असे सांगितले जाते. प्राणतत्त्व (किंवा विद्युत शक्ती) नियमित करणारी शक्ती रुद्राक्षात (रुद्राक्षमालेत) असते. रुद्राक्षमालेने मंत्रसाधकाला मन:शक्तीवर नियंत्रण साधता येते असे योगी, ऋषी म्हणतात. रुद्राक्ष डोकेदुखी, खोकला, पक्षाघात, रक्तदाब आणि हृदयविकाराशी संबंधित समस्या दूर करतो. रुद्राक्ष धारण केल्याने चेहऱयावर चमक येते. अध्यात्म आणि आरोग्यामध्ये महत्त्वाची भूमिका असलेला रुद्राक्ष हिंदुस्थानसह नेपाळ, इंडोनेशियामध्ये मिळतो. ज्योतिषशास्त्रात आणि आयुर्वेदातही याचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो.

एकमुखी, दोनमुखी, तीनमुखी, चारमुखी, पाचमुखी, सहामुखी, सप्तमुखी, अष्टमुखी, नऊमुखी, दहामुखी, अकरामुखी, बारामुखी, तेरामुखी, चौदामुखी, गौरीशंकर रुद्राक्ष, त्रिभुज दत्तस्वरूप रुद्राक्ष असे प्रकार सांगितले जातात. विविध आजारांवर हे रुद्राक्ष धारण करावेत असे सांगितले जाते. विशेष म्हणजे आजाराच्या प्रकारानुसार कोणता रुद्राक्ष धारण केला पाहिजे ते सांगितले जाते. नेत्रविकार, डोकेदुखी, हृदयविकार, अस्थिविकार, त्वचाविकार, उदरविकार या सर्व रोगांवरील उपचारांत एकमुखी रुद्राक्षांची माळ फार प्रभावी आहे.

[email protected]