
राष्ट्रवादी काँग्रेसवर आपला दावा सांगणारे अजित पवार यांना आज माढा येथील एका कार्यक्रमात काळे झेंडे दाखवण्यात आले. अजित पवार यांचं भाषण सुरू होताच मराठा आंदोलकांनी उभं राहून काळे झेंडे दाखवले आणि ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा दिल्या. यानंतर एकच गोंधळ उडाला आणि पोलिसांची पळापळ झाली. त्यांनी मराठा आंदोलकांना ताब्यात घेत त्यांना सभागृहाबाहेर नेलं. मात्र तरीही आंदोलक ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देतच होते.
मराठा आंदोलकांनी अजित पवारांच्या माढ्यातील कार्यक्रमाला विरोध दर्शवला होता. मात्र अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. अजित पवार बोलण्यास उभे राहिले तेव्हा मराठा आंदोलकानं काळा झेंडा दाखवत घोषणाबाजी केली. पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतलं. यावेळी सत्तेत इतकी वर्षे असताना आंदोलन दिलं नाही, यावर नाराजी व्यक्त केली, तसेच जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही यांना सोबत देणार नाही, असा इशारा देखील आंदोलकानं दिला आहे.
अजित पवार यांच्या उपस्थितीत विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचा गाळप हंगाम कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी हा प्रकार घडला.


























































