राज्य बँकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी! 43 हजार रुपयांपासून 3 लाख 58 हजार रुपयांपर्यंत दिवाळी बोनस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील सहकारी बँकांची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांची यंदा खर्या अर्थाने दिवाळी होणार आहे. बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांना साडेतेरा टक्के दिवाळी बोनस जाहीर केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना 43 हजार रुपयांपासून 3 लाख 58 हजार रुपये एवढा घसघशीत बोनस मिळणार आहे.

राज्य बँकेला 2022-23 या आर्थिक वर्षात 609 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळाला असून नक्तमूल्य 4100 कोटी रुपयांवर गेले आहे. तसेच 2017-18 मध्ये प्रतिकर्मचारी 26 कोटी रुपये एवढा असलेला व्यवसाय 76 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. बँकेची आर्थिक स्थिती भरभक्कम झाल्याने बँकेने आपल्या 779 कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेत आतापर्यंतचा सर्वाधिक साडेतेरा टक्के एवढा दिवाळी बोनस जाहीर केला आहे. त्यामुळे बँकेवर सुमारे नऊ कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार असल्याची माहिती बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली. तसेच पंत्राटी कर्मचाऱ्यांनाही दिवाळी भेट म्हणून सरसकट 10 हजार रुपये दिले जाणार आहेत. बँकेने कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करतानाच तत्काळ तो त्यांच्या बँक खात्यात वळता केला आहे.

राज्य सहकारी बँकेचा स्वनिधी 7100 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे आशिया खंडातील सर्वात सक्षम राज्य बँक ठरली असून त्यामध्ये कर्मचाऱ्यांचाही मोलाचा वाटा असल्याचे बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.