
>>अस्मिता येंडे
‘लेखक, कवी सुनील पांडे लिखित ‘एक होती बाई’ हा कवितासंग्रह म्हणजे आजीच्या स्मृतींचे अवशेष आहे. त्यांनी आपल्या आजीविषयीच्या आठवणी पुस्तकरूपात कायमस्वरूपी शब्दबद्ध केल्या आहेत. आईवर सगळेच कविता लिहितात, पण आजीच्या प्रेमाची आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाची दखल घेणारा हा कवितासंग्रह वाचल्यानंतर प्रत्येक वाचकाला आपल्या घरातील आजीचे अस्तित्व जाणवू लागेल, अशी रचना या संग्रहाची आहे.
कवी, लेखक सुनील पांडे यांनी आपल्या आजीच्या निधनानंतर लिहिलेल्या या कविता असून लेखकाने आजीच्या आयुष्याशी निगडित प्रत्येक लहानातील लहान आठवण अगदी प्रांजळपणे व्यक्त केली आहे. ‘एक होती बाई’ या शीर्षकात त्या एकेरी नावात आपलेपणा जाणवतो. कवितांची रचना मुद्देसूद आणि आटोपशीर असून या कवितांमधून कवीने आपल्या आजीचे चरित्रचित्रण रेखाटले आहे. सुनील पांडे यांच्या आईची आई म्हणजे त्यांची आजी गंगूबाई विश्वनाथ शिंदे. पण सगळेच आजीला ‘बाई’ या नावाने संबोधत असत. बाईच्या संपूर्ण जीवनाचा संवेदनशील आणि संघर्षदायी प्रवास यात मांडलेला आहे.
कवीने या कवितासंग्रहाद्वारे आजीच्या जीवनाची स्मरणगाथा संवेदनशीलतेने वाचकांसमोर आणली आहे. आजकाल विभक्त कुटुंबपद्धतीमुळे आजच्या पिढीला आजी-आजोबांचा सहवास दुर्लभ झाला आहे. कामनिमित्त मुले परदेशी जातात, तिथेच स्थायिक होतात. त्यांची मुलेही तिथेच लहानाची मोठी होतात. त्यामुळे मुलांवर संस्कार करणारी, त्यांना गोष्टी सांगणारी आजी नावाची व्यक्तीची ओळख नव्या पिढीला जाणीवपूर्वक करून देणे आवश्यक आहे आणि म्हणून ‘ एक होती बाई’ हा काव्यात्मक संवाद आपण जरूर वाचला पाहिजे.
कवितासंग्रहाच्या पानोपानी बाईचे प्रतिबिंब अवतरले आहे. स्नेहलता तावरे यांनी सुंदर शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ समर्पकतेने संतोष घोंगडे यांनी साकारले आहे. कवी प्रवीण दवणे यांनी कवितासंग्रहाची पाठराखण केली आहे.






























































