
दक्षिण मुंबईतल्या गोल देऊळ जंक्शन येथे शुक्रवारी रात्री एका मिरवणुकीदरम्यान तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. घोषणाबाजी, दगडफेक व हमरीतुमरी झाल्याने प्रकरण गंभीर झाले होते. पण सुदैवाने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात मिरवणुकीच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करून एकाला अटक करण्यात आली आहे.
शुक्रवारी रात्री दहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास जे.जे.मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौलाना आझाद मार्गावरून डोंगरी येथील अब्दुल रहमान शाह बाबा दर्गा येथे मिरवणूक काढण्यात आली होती. त्या मिरवणुकीत जनरेटर वाहन त्याला जोडलेला ट्रक होता. तसेच पोलीस व अन्य विभागाची परवानगी न घेता जोरजोरात डीजे वाजविण्यात येत होता. त्या मिरवणुकीत 50 ते 60 लोपं होती. दरम्यान, मोठय़ा आवाजात लावलेल्या डीजेमुळे स्थानिकांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यावरून वातावरण चिघळले.
मिरवणुकीतील काहींनी तसेच स्थानिकांमध्ये घोषणाबाजी झाली. तसेच दगड भिरकावून तेथे असलेल्या एका इमारतीच्या काचा पह्डण्यात आला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, पण वेळीच पोलिसांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण वाढले नाही. याप्रकरणी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात मिरवणुकीचे आयोजक अमान कुरेशी, साहिल कुरेशी व अन्य लोकांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून एकाला अटक करण्यात आली आहे.




























































