आंबेगावातील 103 ग्रामपंचायतीच्या 68 संगणक परिचालकांचे बेमुदत काम बंद आंदोलन, ‘या’ आहेत मागण्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील 28 हजार ग्रामपंचायतीचे संगणक परिचालकांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प झाला आहे.या आंदोलनाला पाठिंबा देत आंबेगाव तालुक्यातील 103 ग्रामपंचायत मधील 68 संगणक परिचालकांनी 17 नोव्हेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आंबेगाव तालुक्यातील सर्व संगणक परिचालक या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

संग्राम व आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून गेल्या बारा वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक प्रामाणिक काम करत असताना शासनाने ग्रामपंचायतच्या सुधारित आकृतीबंधात कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळेपर्यंत मासिक वीस हजार मानधन देणे या प्रमुख मागण्यांकडे शासनाने अनेक वेळा लेखी व तोंडी आश्वासन देऊन सुद्धा दुर्लक्ष केले. सुधारित आकृतीबंधाची फाईल जागेवरच असून अनेक जिल्हा परिषदेकडून अभिप्राय दिलेला नसल्याने हा शासनाचा व प्रशासनाचा वेळ काढूपणा असल्याची संगणक परिचालकांची भावना झाली असून, एकीकडे कर्मचारी दर्जा व किमान वेतन द्यायचे नाही व दुसरीकडे महागाईच्या काळात केवळ सहा हजार नऊशे तीस रुपये मासिक मानधनावर काम करावे लागत आहे.हे मानधन देखील केव्हाच वेळेवर मिळत नाही.

ग्रामस्तरावर काम करणारे ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी ताई, पोलीस पाटील कोतवाल यांच्या मानधनात वाढ झाली. मात्र संगणक परिचालक मात्र दुर्लक्षित आहेत.टार्गेट सिस्टीम लागू करून संगणक परिचालकांना कंपनीकडून मानसिक त्रास देणे सुरू असल्याची तक्रार आहे. आंबेगाव तालुक्यातील 103 ग्रामपंचायतीचे 68 संगणक परिचालकांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केल्याने तालुक्यातील विविध गावचा कारभार ठप्प झाला आहे.असे आंबेगाव संगणक परिचालक संघटनेचे तालुका अध्यक्ष सुशीला काळे सचिव संदीप आळेकर व उपाध्यक्ष शाहरुख पटेल यांनी सांगितले.