
>> मंगेश उदगीरकर
आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगद विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी, पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते. हे तरल अस्तर उलगडताना भेटलेल्या अवलियांविषयी.
परभणीच्या शिवाजीनगर भागात 1980च्या दरम्यान मी राहायला गेलो तेव्हा थोडा भांबावून गेल्यासारखा झालो होतो. कारण ती उच्चभ्रू लोकांची वस्ती होती. त्या मानाने आम्ही ’गावरान’! पण थोडय़ा दिवसांत आम्ही तिथे रुळलो. आमच्या घराच्या बाजूलाच ’सदाचार’ नावाची दुमजली इमारत होती. इमारतीच्या मालकांना चार मुलं असल्याने त्यांनी अत्यंत कल्पकतेने घरासाठी हे नाव निवडलं होतं. या इमारतीत दोन भाडेकरूही होते. खालच्या मजल्यावरच्या दोन खोल्यांत वास्तव्य असणाऱया घरावरची पाटी मला अस्वस्थ करून सोडत होती. पाटीच तशी होती, ’सिनेगायक उदय वाईकर!’ इतका मोठा कलावंत आपल्या शेजारी वास्तव्य करून आहे याचे अप्रूपही होते आणि त्याला पाहण्याची उत्सुकताही. मीही थोडाफार गाण्याबजावण्यातला असल्याने तर ही उत्सुकता जास्तच वाढीला लागली होती, पण त्यांचं दर्शन होत नव्हतं. शेवटी अनावर उत्सुकतेने मी एके दिवशी त्यांच्या दारावर थाप दिली. समोर एक माझ्याच वयाची व्यक्ती चेहऱयावर प्रश्नचिन्ह घेऊन उभी होती.
“माफ करा. आपली ओळख नाही. मी आपल्या शेजारी राहायला आलो आहे. म्हटलं ओळख करून घ्यावी म्हणून…”
‘’या, या! बसा.”
‘’ती तुमची नेमप्लेट पाहून उत्सुकता वाटली.”
“अरे, ती होय. हिच्या आग्रहावरून लावली.” त्यांचा विनय माझा त्यांच्याविषयीचा आदर वाढवून गेला.
‘’आपण सिनेमात गाता?”
‘’हो.” माझे डोळे विस्फारले!
‘’कोणत्या सिनेमात आपली गाणी आहेत? मी ऐकलीही असतील कदाचित, पण तरीही…”
‘’मी कोरसमध्ये गातो. तुम्ही ’रंबा हो…’ ऐकलंय? त्या कोरसमध्ये माझा आवाज आहे.”
त्यांनी मला भूतलावर आणलं. मी खोलीत टांगलेल्या फोटोंवर नजर फिरवली. लता मंगेशकर, उषा मंगेशकर, किशोर कुमार यांच्या समवेत त्यांची छायाचित्रं होती. नंतरच्या गप्पांमध्ये त्यांची या सगळ्या मान्यवरांशी किती जवळकीचं नातं होतं हे त्यांनी रसभरीतपणे सांगितलं. वाईकरांची बोलण्याची शैली, प्रसंग उभा करण्याची हातोटी इत्यादींनी मला त्यांच्या प्रेमात पाडलं हे मात्र खरं. नंतर काही दिवसांतच आम्ही दोघे ’अरे-तुरे’वर आलो.
बऱयापैकी उंची, सावळा वर्ण, डोईवर घनदाट कुरळ्या केसांची दाटी, समद्विभुज त्रिकोणासारखे नाक, त्याखाली बारीक मिश्यांखाली कायम हसरी जिवणी आणि तसेच डोळे, स्थूल अंगयष्टी. थोडक्यात, कुणालाही आपलेसे करून टाकणारी देहबोली. हा कृषी विद्यापीठात प्रोफेसर होता खरा, पण काही तासांपुरता. एरवी बोलण्यावागण्यात कायम गाणे हाच विषय. याच्या घशात, बोलण्यात, वावरण्यात पाण्यात रंग मिसळावा तसा विरघळलेला एकच गायक किशोर कुमार!
‘’मंगेश, तुला काय सांगू! किशोरची माझ्यावर फार माया होती. मी त्याच्याबरोबर खूप स्टेज शो केले. असा एखादा शो असला की म्हणायचा, अरे, वो उदय आया की नही? वो है तो शो करूंगा, नही तो नही.”
‘’अरे वा!”
‘’अरे, तुला काय सांगू, औरंगाबादला शो होता. किशोरचा मूड गेला होता. तो गाडीखाली उतरेचना. शेवटी संयोजक माझ्याकडे आले. ते म्हणाले, उदय अब तुम ही उसको मना सकते हो. मला त्यांची दया आली. गाडीजवळ गेलो. म्हटलं, किशोरदा, आपको गाना ही पडेगा. त्यांनी मान फिरवली. मग म्हटलं, दादा, पान लावू क्या? त्यांची कळी खुलली! मी त्यांना त्यांच्या आवडीचं पान आणून दिलं. मी त्यांना पुन्हा विनवलं, दादा, मेरे खातीर आपको गानाही पडेगा. मग त्यांनी बाजूला पिंक टाकली आणि म्हणाले, यार उदय, तू नही सुधरेगा. चल, तू बोलता है इसलिये गाता हूं.”
उदय परभणीला अजूनही ’एक शाम किशोर के नाम’ हा कार्पाम किशोरच्या स्मरणार्थ करत असतो. त्याच्या सुरूवातीला मीही त्यात असायचो. शहरातली नामवंत मंडळी बोलावली जायची, पण त्याअगोदर ज्या रिहर्सल व्हायच्या त्यात त्याचे वडीलही असायचे. शाहीर प्रभाकरराव वाईकर. भरदार आवाजाचे स्वामी. हे पेटीवर असायचे. “हां उद्या, म्हण गाणं. तुझी पट्टी कोंती?” याला सांगता यायचं नाही. मग त्याला शिव्या घालत ते अॅडजस्ट करून घ्यायचे. वाजवायला कुणीच नसल्यामुळे तबल्यावर मी. माझं वाजवणं म्हणजे मोडक्या घराला शिडी! कुत्र्याला पट्टा बांधून ओढत न्यावं तसा मी त्याच्या सुरांबरोबर फरफटत जाई.
‘’ उदय, जरा तालाबरोबर गा ना यार.”
‘’तू सुरांबरोबर वाजव.” त्याच्या वडिलांसारखं मी पण अॅडजस्ट होऊन जायचो. काही का असेना, ते माझे आनंदाचे दिवस होते.
उदय कुठे दिसेल, नेम नसायचा. एकदा अरुण दातेंच्या भावगीत गायनाचा कार्पाम होता. अलोट गर्दी. लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली. शेवटी पडदा उघडला तर समोर हा उभा.
‘’रशिक जन हो. मी सिनेगायक उदय वाईकर आपले स्वागत करतो…”
प्रेक्षक, संयोजक, स्वत: अरुण दाते… सगळ्यांनाच पावून टाकणारी त्याची एंट्री नंतर चर्चेचा विषय होऊन राहिली होती. एकदा तर पुण्याच्या सवाई गंधर्वच्या स्टेजवर झाकीर हुसेनच्या सोलो तबल्याच्या बाजूला पेटीवर लेहरा धरून हा बसलेला.
‘’उदय, तुला तुझी पट्टी माहीत नाही, तर प्रत्यक्ष झाकीर हुसेनच्या बाजूला?”
त्याचं ते रहस्यमय स्मित अजून माझ्या लक्षात आहे. मी ज्यांना अंतरंगातले मित्र मानतो, त्यात उदय अग्रामावर आहे. हा भोळा, साधासरळ, कुणावरही पटकन विश्वास ठेवणारा, प्रसंगी पाठीवर हात ठेवून धीर देणारा मित्र मला लाभला. हा बेटा इतका भाग्यवान की, त्याला साथ देणाऱया आमच्या वहिनी सदा हसतमुख. काल परवापर्यंत “काका काका” म्हणून माझ्या आजूबाजूला हुंदडणारी त्याची पिलावळ आता मोठी झाली आहे. अनिकेत डॉक्टर झालाय, अपूर्वा इंजिनीअर, तर सौरभ इंजिनीअर होऊन अमेरिकेत गेलाय.
उदय, मित्रा… तू मला मित्र मानलंस हा माझा गौरव आहे. तू असाच मोठा होत रहा.
❚ [email protected]































































