
राज्यातील अभियांत्रिकी, औषधी निर्माणशास्त्र, तंत्रनिकेतन आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱया अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळाली नसल्याच्या मुद्यावरून आज विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात आज जोरदार शाब्दिक चकमक उडाली. राज्य सरकार कांदा, इथेनॉलच्या प्रश्नावर केंद्र सरकारकडे जाते; मग मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी केंद्राकडे का प्रयत्न करत नाही, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यावर कांदा आणि इथेनॉलचा विषय शेतकऱयांशी संबंधित आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या प्रश्नावर केंद्राकडे जाऊ नये काय, असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला
राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱया शिष्यवृत्तीच्या रकमेत गेल्या पाच वर्षांत वाढ झालेली नाही. त्यामुळे यासंदर्भात मंत्रिमंडळात प्रस्ताव आणून चर्चा केली जाईल, असे गुलाबराव पाटील म्हणाले. उद्योगपतींच्या खात्यात आपण पैसे देतो, तर मग विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे गेले म्हणून तुम्हाला राग का येतो, असा सवाल गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्षाला उद्देशून केला. यावर वडेट्टीवार यांनी गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याला आक्षेप घेत, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे द्यायला न्यायालयाचा अडथळा कुठे होता, असा सवाल केला.

























































