विविध घटनांमध्ये ऑनलाइन फसवणूक करणारे गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टास्क, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक आणि कमिशनच्या नावाखाली फसवणूकप्रकरणी तिघांना उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली.

मालाड येथील एका व्यावसायिकाला काही दिवसांपूर्वी मोबाईलवर मेसेज आला. टास्कच्या नावाखाली त्याच्याकडून 12.19 लाख रुपये उकळले. फसवणूकप्रकरणी व्यावसायिकाने उत्तर प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तपासादरम्यान पोलिसांना एका बँक खात्याची माहिती मिळाली. पोलिसांनी ते बँक खाते गोठवले. पोलिसांनी खातेधारकाला चौकशीसाठी बोलावले. ते खाते त्याचा पुतण्या वापरत असल्याचे समोर आले. अखेर पोलिसांनी सिद्धार्थ बिस्वासला ताब्यात घेतले. चौकशी केल्यावर त्याने कबुली दिली.

दुसरी घटना व्यापाऱयाच्या फसवणुकीची आहे. बोरिवली येथील व्यापाऱयाने सोशल मीडियावर शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत जाहिरात पाहिली. त्या जाहिरातीला ते बळी पडले. ठगाने भूलथापा मारून त्यांच्या खात्यातून 15 लाख 85 हजार रुपये उकळले. वरिष्ठ निरीक्षक विजय चंदनशिवे यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक संजय पवार आणि पथकाने तपास सुरू केला. फसवणुकीचे पैसे ज्या खात्यात होते, त्या माहितीवरून शीव कोळीवाडा येथून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

तिसरी घटना ही एका पंचतारांकित हॉटेलच्या निवृत्त महाव्यवस्थापकाला गंडा घातल्याची आहे. कांदिवलीतील तक्रारदाराला मोबाईलवर एक मेसेज आला होता. त्यांना एक टास्क देण्यात आला होता. टास्कच्या नावाखाली त्याची 18 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक झाली होती. सहाय्यक निरीक्षक संदीप पाचंगणे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली. त्या माहितीनंतर पोलिसांचे पथक राजस्थान येथे गेले. तेथून पोलिसांनी मंगल सिंग राठोडला अटक केली.