
नगर जिह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने यंदा पाणीटंचाईच्या तीव्र झळा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. हिवाळ्यातच टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. शासनाने हाती घेतलेल्या ‘जलयुक्त शिवार 2.0’ योजनेसाठी जिह्याला 22 कोटींचा निधी मंजूर झाला अन् त्यातील साडेचार कोटी वर्गही केले. पण वर्षभरात एकाही कामाला प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. केवळ ‘जलयुक्त 2.0’चे कागदी घोडे नाचविले जात असल्याचे वास्तव समोर आले आहे.
पावसाची अनियमितता व खंडामुळे सतत टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली. या टंचाई स्थितीवर मात करण्यासाठी 2015-16 पासून ते 2018-19 पर्यंत जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली होती. जलसमृद्धी वाढवून गावचा व तेथील शेतकऱयांचा सर्वांगिण विकास व्हावा, हाच योजनेचा उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात जलसंधारणाची कामे न झालेल्या ठिकाणी दुसऱया टप्प्यात कामे घेऊन पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी संरक्षित करणे, पाण्याच्या ताळेबंदीच्या माध्यमातून जलसाक्षरता वाढविणे, विकेंद्रित जलसाठे निर्माण करणे, जलस्रोतांची साठवण क्षमता वाढविणे इत्यादी कामांसाठी ‘जलयुक्त शिवार 2.0 अभियान’ हाती घेतले गेले. मुख्यमंत्री शिंदे यांनी 3 जानेवारी 2023 रोजी ही योजना राबविण्याबाबत शासन आदेश काढला होता. तसेच निधीची तरतूदही केली. सप्टेंबरमध्ये 257 निवडलेल्या गावांसाठी (यात नंतर वाढ होऊन गावे 368 झाली) 22 कोटी 65 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यापैकी प्रत्यक्षात 4 कोटी 53 लाख रुपये निधीही दिला होता. दुर्दैवाने टप्पा दोनमधील एकाही कामाची प्रशासकीय मान्यता देण्यासाठी जिल्हाधिकाऱयांना वेळ नसल्याने हा निधीदेखील अखर्चित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जलसंधारण विभागातून योजनेच्या अंमलबजावणीसाठी वर्षभरापासूनच हालचाली सुरू आहेत. मात्र, सध्यातरी त्या हालचाली फक्त कागदावरच आहेत. कार्यकारी अभियंता पांडुरंग गायसमुद्रे यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारेचा पदभार असताना, त्यांच्याकडे जलसंधारण विभागाचीही जबाबदारी ढकलली आहे. त्यामुळे आता फक्त तीन महिने बाकी असताना, कधी प्रशासकीय मान्यता, निविदा आणि प्रत्यक्षात कामे कधी होणार, याविषयी कुतूहल आहे.
उपलब्ध निधीतून 2500 कामे सुरू
z नगर जिह्यात जलसंधारण, कृषी, सामाजिक वनीकरण, वन विभाग, जलसंपदा, वरिष्ठ भूवैज्ञानिक विभाग, मनरेगा इत्यादी विभागांतील कामांचा टप्पा दोनमध्ये समावेश आहे. मात्र, यातील कामांना प्रशासकीय मान्यताच नसल्याने या विभागाने आपल्याकडील जिल्हा नियोजन किंवा अन्य योजनांतील उपलब्ध निधीतून कामे सुरू केलेली आहेत. जिह्यात 2500 पेक्षा अधिक कामे सुरू असून, राज्यात टक्केवारीत नगर पुढे असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तर जलयुक्त टप्पा दोन मात्र अजून सुरू होऊ शकला नसल्याची खंतदेखील याच विभागाकडून व्यक्त केली जात आहे.
‘जलयुक्त’च्या टप्पा दोनच्या कामांना अजून, प्रशासकीय मान्यता झालेल्या नाहीत. एक-दोन दिवसांत त्या होतील. या योजनेचा 22 कोटींचा निधी मंजूर असला, तरी प्रत्यक्षात चार-साडेचार कोटी प्राप्त आहेत. मार्च 2024 पर्यंत निधी खर्च करायचा आहे.
– पांडुरंग गायसमुद्रे, प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी.



























































