
भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने वॉरंट बजावले आहे. मालेगाव 2008 बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणीवेळी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर गैरहजर राहिल्याप्रकरणी त्यांना 10,000 रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
साध्वी प्रज्ञासिंह या खटल्यात प्रमुख आरोपी आहे. त्यांना न्यायालयाने सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्या सुनावणीसाठी उपस्थित नव्हत्या. त्यांच्या वकीलाने वैद्यकीय कारणास्तव त्यांना उपस्थित राहण्यापासून सूट देण्यात यावी, असा अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आणि त्यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

























































